प्रदेशाध्यक्षांनाच माहीत नाही प्रशांत किशोर सल्लागार; दत्ता भरणे म्हणाले, आहे…
प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हे मलाच माहिती नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही, पण जर त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असती तर मला त्याची नक्की माहिती असती, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री दत्तात्राय भरणे यांनी मात्र प्रशांत किशोर हे आमचे राजकीय सल्लागार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सुनील तटकरे यांच्याविरोधात पक्षात नाराजी असल्याची देखील चर्चा सुरू आहे, यावर देखील यावेळी भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे आमचे नेते आहेत, कुठेही पक्षात त्यांच्याविरोधात नाराजी नाही. भाजपचीही कुठेही नाराजी नाही. भाजप आमचा मोठा भाऊ आहे, असं यावेळी भरणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज शेतकरी कर्जमाफीचा पहिला हफ्ता हा शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. यावर देखील यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा पहिला हफ्ता जमा करण्यात आला आहे. ५ हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार आहे. आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कगदपत्रांची पूर्तता होईल, तसे पैसे जमा करण्यात येतील, या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती यावेळी दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.