EXCLUSIVE: पालघर झेडपीत दीड कोटीचा बारकोड घोटाळा

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मोहम्मद हुसेन, टीव्ही 9 मराठी, पालघर: जिल्हा परिषद आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या पपेरलेस बारकोड आणि टोकन प्रणालीत सुमारे सव्वा कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. 25 ते 30 हजाराची बारकोड प्रणाली 3 लाख 29 हजारात खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. आरोग्य उपसंचालक ठाणे यांनी ही निविदा काढल्याची माहिती आहे. मात्र किंमत फुगवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. […]

EXCLUSIVE: पालघर झेडपीत दीड कोटीचा बारकोड घोटाळा

Follow us on

मोहम्मद हुसेन, टीव्ही 9 मराठी, पालघर: जिल्हा परिषद आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या पपेरलेस बारकोड आणि टोकन प्रणालीत सुमारे सव्वा कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. 25 ते 30 हजाराची बारकोड प्रणाली 3 लाख 29 हजारात खरेदी केल्याचं सांगण्यात येत आहे. आरोग्य उपसंचालक ठाणे यांनी ही निविदा काढल्याची माहिती आहे. मात्र किंमत फुगवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड हे आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. एव्हढं करुनही दीड वर्षांनंतरही संच वापराविना धूळ खात पडून आहेत. तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड यांनी दाखला दिला होता. मशिन्स कार्यान्वित नसतानाही ठेकेदाराला पैसे देण्यात आले.

कागदाचा वापर टाळून रुग्णांच्या नोंदी ठेवण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पेपरलेस बारकोड आणि टोकन प्रणाली साहित्य खरेदी केलं होतं. मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत 1 कोटी 50 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले असून, हा घोटाळा शिवसेनेचे  जिल्हा परिषद सदस्य आणि  जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी उघड केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे पितळ उघड्यावर पडले आहे.

जिल्ह्यात प्रथम अशी प्रणाली जव्हार जामसर आरोग्य केंद्रात कार्यान्वित करण्यात आली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तलासरी दौऱ्यावर आले असताना त्यावेळी त्यांनी याची पाहणी केली होती. जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांना पेपरलेस मशिन्स पुरवठा करण्यासाठी आरोग्य उपसंचालक ठाणेद्वारा  मार्च  2017 रोजी 1 करोड 48 लाख 19 हजार 85 रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून मेसेर्स न्यू ओवही फार्मसिटीकल नावाच्या कंपनीला याचे टेंडर देण्यात आले होते.

45 आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आलेल्या या संचाचा दीड वर्षांनंतरही वापर तर झाला नाहीच. परंतु बाजारात 25 ते 30 हजार रुपयांत मिळणाऱ्या प्रत्येक संचासाठी आरोग्य विभागाने तब्बल 3 लाख 29 हजार 313 रुपये इतकी म्हणजेच या प्रणालीच्या 45 संचांसाठी तब्बल 1 कोटी 48 लाख 19 हजार 85 रुपये इतकी रक्कम मोजली. याचाच अर्थ शासनाच्या पैशांचा अपहार झाल्याचे स्पष्ट आहे.

आरोग्य केंद्रांना या पेपरलेस बारकोड आणि टोकन प्रणालीत लॅमिनेशन मशीन, लॅमिनेश पाऊच, पेपर रोल, स्कॅनर टेबल टॉप, स्कॅनर बारकोड, बारकोड प्रिंटर आदींचा समावेश आहे. या प्रत्येक संचासाठी 3 लाख 29 हजार 313 रुपये इतकी रक्कम मोजण्यात आली. मार्च 2017 मध्ये हे संच प्रत्येक आरोग्य केंद्रात पोचले खरे, मात्र हे सर्व साहित्य आजही वापराविना आरोग्य केंद्रात धूळखात पडून असल्याचे खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांना आढळले. तसे पंचनामेही केले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांनी विविध अरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता  त्यांना  ही  बाब आढळून आली.

हे संच आरोग्य केंद्रांना पाठविल्यानंतर ते त्या त्या केंद्रात कार्यान्वित केल्यानंतरच त्याचे देयक अदा करणे अपेक्षित होते. पण  त्याची पडताळणी न करता ठेकेदाराला देयक दिले गेले.

स्थायी समितीच्या सभेत हा घोटाळा पुराव्यानिशी सचिन पाटील यांनी उघडकीस आणला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनीही या घोटाळ्याच्या चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता मुंबई महापालिकेत उपायुक्त असलेल्या निधी चौधरी,आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड आणि या प्रकरणाशी संबंधित अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

समितीच्या सभेत या घोटाळ्यावर झालेल्या चर्चेनंतर प्रशासन यासाठी त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून 26 नोव्हेंबरपर्यंत अहवाल येईल, यात दोषी आढळण्याऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी टीव्ही 9 ला सांगितलं.

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI