
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी रात्री एक गंभीर घटना घडली. या घटनेमुळे प्रेक्षकांमध्ये मोठा गोंधळ आणि संताप पाहायला मिळाला. प्रसिद्ध गुजराती जिग्नेश भाई जोरदार या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाट्यगृहातील कॅन्टीनमध्ये एक्सपायरी डेट संपलेल्या कोल्ड्रिंकच्या बाटल्यांची विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या बाटल्या जास्त दराने विकल्या जात होत्या, अशीही माहिती समोर आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी उपहारगृह चालकाला जाब विचारला असता त्याने उद्घट उत्तर दिले आणि त्यामुळे वातावरण अजूनच तापले.
रविवारी जिग्नेश भाई जोरदार या गुजराती नाटकाचा प्रयोग कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. रात्री १०.३० च्या दरम्यान या नाटकाच्या इंटरव्हलमध्ये अनेक प्रेक्षक उपहारगृहात खाण्यासाठी आणि पिण्यासाठी गेले. त्यावेळी काहींना पाण्याची बॉटल खरेदी केली. मात्र ही २० रुपयांची कोल्ड्रिंकची बाटली २५ ते ३० रुपयांना विकली जात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
पण यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. जेव्हा प्रेक्षकांनी त्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट तपासली. त्यावेळी अनेक बाटल्यांची मुदत संपलेली होती. हा गंभीर प्रकार लक्षात येताच प्रेक्षकांनी उपहारगृह चालकाला याबद्दल विचारणा केली.
यावर त्या चालकाने घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर निघा असा उद्धट आणि बेजबाबदार प्रतिसाद दिला. त्याच्या या उद्दाम बोलण्यामुळे प्रेक्षकांचा संताप अनावर झाला. त्यांनी नाट्यगृहात जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रेक्षकांच्या आक्रमक भूमिकेमुळे उपहारगृह चालकाने शेवटी आपली चूक मान्य करत माफी मागितली. मात्र, प्रेक्षक फक्त माफीवर थांबायला तयार नव्हते. मुदत संपलेलं कोल्ड्रिंक विकणं हा एक गंभीर गुन्हा आहे, यावर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
नाट्यगृहात सुरू असलेल्या गोंधळाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुदत संपलेल्या बाटल्या ताब्यात घेऊन पंचनामा केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस कॅन्टीन चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध नाट्यगृहात अशाप्रकारे प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.