मोठी बातमी! शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी आली, ‘या’ विभागातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये एकूण ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. यंदा दोन महिने पाऊस झाला पण दोन महिने गायब झाला आहे. त्यामुळे सर्वांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. अशात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये एकूण ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आतापर्यंत २४.६७ लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर
या योजनेसाठी बँकांनी पोर्टलवर ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. त्यानंतर २४ जुलै २०२६ रोजी पहिली, ११ सप्टेंबर रोजी दुसरी आणि १२ ऑक्टोबर रोजी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. आतापर्यंत एकूण २४.६७ लाख शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, या तिसऱ्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक २ लाख ६ हजार ४५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. अमरावती विभागातील ८५ हजार ७६, नागपूर विभागातील ३० हजार ७३८, नाशिक विभागातील १४ हजार २४४, पुणे विभागातील ११ हजार ९२८ आणि कोकण विभागातील २ हजार ७५६ शेतकरी या यादीत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
पात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या खात्यावरील थकबाकी तपासून घेण्याचे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
