
गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत भीषण अपघातांमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच नागपूर-भंडारा महामार्गावर दोन चुलत बहिणींना आपला जीव गमवावा लागला. तर नाशिक आणि मुंबईत झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी एक मन सुन्न करणारी घटना घडली. एका घरगुती कार्यक्रमासाठी उत्साहाने निघालेल्या दोन बहिणींवर भरधाव वाहनाने झडप घातली. महालगाव जवळील नाग नदीच्या पुलावर झालेल्या या भीषण अपघातात दोन चुलत बहिणींचा करुण अंत झाला. यामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नागपूरच्या पिपळा डाक बंगला परिसरात राहणाऱ्या अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोघी बहिणी दुचाकीने भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. भर दुपारी नाग नदीच्या पुलावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जास्त होती की, अलिशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मोनाली यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच अखेरचा श्वास घेतला.
या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या मृतांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण होते. अलिशा यांचा विवाह अवघ्या ७ महिन्यांपूर्वी झाला होता. त्या संसाराची नवी स्वप्ने पाहत होत्या. तर दुसरीकडे, मोनाली यांचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला निश्चित झाला होता. त्यांच्या घरात लग्नाची खरेदी, नातेवाईकांना निमंत्रण देण्याची लगबग सुरु होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच या अपघाताने दोन्ही घरांचे हसते-खेळते अंगण एका क्षणात उजाड केले.
या अपघातानंतर महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही धडक देऊन पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. लग्नाच्या गाठी बांधल्या जाण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घावामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे नाशिकच्या सातपूर भागातील अशोक नगर भाजी मार्केट परिसरात एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या कारने रस्त्यावरील मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. या घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे. त्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड केली. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, मुंबई-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या किया कारला एका मोटरसायकलने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील काशिमिरा पुलावर एक भीषण अपघात झाला असून येथे एक डंपर उलटल्याची घटना घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणीही जखमी झाले नाही. मात्र, डंपर उलटल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.