मालाड प्राध्यापक हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीच्या वकिलाच्या त्या युक्तिवादाने मोठं आव्हान; काय घडलं कोर्टात?
मालाड येथील प्राध्यापक आलोक सिंग यांच्या हत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट समोर आला आहे. अटक केलेल्या ओंकार शिंदेच्या वकिलाने न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला आहे की, "ही हत्या नाही, अपघात असू शकतो," तसेच आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग नसल्याचा दावा केला. यामुळे हत्येच्या आरोपावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कोर्टात पुढील सुनावणीत हे प्रकरण नवे वळण घेण्याची शक्यता आहे.

मुंबईतील प्रतिष्ठीत एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची काल रेल्वे प्लॅटफॉर्मवर हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून संशयित आरोपी ओमकार शिंदे याला अटक करण्यात आली. त्यानंतर ओमकार शिंदेला कोर्टात आणण्यात आलं. यावेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलाने तर ओमकारने ही हत्या केलीच नसल्याचा दावा केला आहे. उद्या लोकल ट्रेनमध्ये कुणीही चिरडलं तर तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल आरोपीच्या वकिलाने केला आहे. तसेच आरोपीच्या अंगावर किंवा कपड्यावर रक्ताचे डाग नव्हते. सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे आरोपीने हत्या कशी केली? असा सवालच आरोपीच्या वकिलाने केल्याने या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
सरकारी वकील काय म्हणाले?
मालाड हत्या प्रकरणातील आरोपी ओमकार शिंदेला बोरिवलीच्या सुट्टीच्या न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलाने कोर्टात बाजू मांडली. गुन्ह्यातील हत्यार शोधणे बाकी आहे. आरोपी आणि मयत एकाच परिसरात राहतात. त्यामुळे त्यांच्यात काही पूर्वीचे वाद आहेत का? हे तपासायचे आहे. आम्हाला 7 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे, असं सरकारी वकिलाने सांगितलं.
वाचा: डोळ्यात पाणी, कंठ दाटला! शब्द फुटेना… प्राध्यापकाच्या हत्येने नातेवाईक हतबल; थेट पोलिसांवरच…
आरोपीचे वकील कोर्टात काय म्हणाले?
मयत आलोक सिंग याला मारण्याचा आरोपीचा हेतू नव्हता. लोकलमधून उतरत असताना दोघांमध्ये वाद झाला. तो पळून जाण्याच्या उद्देशाने गेला नाही. मयताचे मित्र सोबत होते. ते त्याला मारायला येत होते म्हणून तो पळून गेला. लोकलमधून हजारो वेठबिगार जात असतात, कडिया जात असतात सगळ्यांचे साहित्य सोबत असतं. कोणाच काही लागून त्यांना इजा झाली असेल तर माहीत नाही. फिर्यादीने चाकूने मारले असे म्हटले नाहीये. माझ्या पक्षकाराने ही हत्या केली नसल्याचा आरोपीच्या वकिलाने दावा केला आहे. लोकलमधून हजारो लोक जातात. कोणी चिरडले गेले, काहीही झालं तरी तुम्ही हत्येचा गुन्हा दाखल करणार का?, असा सवाल आरोपीच्या वकिलाने केला आहे. आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कपड्यावर रक्ताचे डाग नाहीत
दरम्यान, आरोपीच्या वकिलाने मीडियाशीही संवाद साधला. वाद विवाद होणे, हत्या होणे हे दोन वेगळे भाग आहेत. गर्दीत किरकोळ वादावादी झाली. फिर्यादीने एफआयआर दिला आहे. तो साक्षीदार आहे. या व्यक्तीने मारलाय, असं त्यात म्हटलं नाही. मला फक्त काही तरी मारलं. एवढंच वाक्य आहे. फिर्यादी आरोपीच्या मागे पळत गेला म्हणून आरोपी पळालेला आहे. जर हत्यार असतं तर हत्यार घेऊन पळाला असता. आरोपीच्या अंगावर, कपड्यावर रक्ताचे डाग नाहीत हे सीसीटीव्हीत दिसतं. लोकलमध्ये एकाच घरातील व्यक्ती नसतात. कडिया काम करणारे, इतर कामगार असतात. त्यांच्यासोबत अवजारं असतात. अवजारं गर्दीत लागू शकतात. आरोपीकडे हत्यार असते तर ते आरोपीच्या हातात किंवा घटनास्थळी मिळाले असते, असं आरोपीच्या वकिलाने म्हटलंय.
