नाशिक जिल्हा गोळीबाराने हादरला, बोलता बोलताच झाडली थेट गोळी, एक जण गंभीर जखमी
बुधवारी पुण्यात गोळीबार झाला होता, ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमधून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा गोळीबाराने हादरला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पुण्यात न्यायालयाच्या परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्हा गोळीबाराने हादरला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथे गोळीबाराची घटना घडली आहे. गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं नैताळे गावात दहशत पसरली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, श्रावण सुरेश पिंपळे असं या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी नाशिकच्या मेडीग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नैताळे गावाच्या पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली आहे. संभाजीनगर येथील गुन्ह्याच्या संदर्भात चर्चा सुरू असताना हा गोळीबार घडला आहे. राहुल वाघमारे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो मुळचा अहिल्यानगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गोळीबार केल्यानंतर संशयित आरोपी राहुल वाघमारे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
पुण्यातही गोळीबार
दरम्यान बुधवारी पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. आधी गोळीबार करण्यात आला, परंतु नेम चुकल्याने नंतर कोयत्यानं सपासप वार करण्यात आले. सहा जणाच्या टोळक्याकडून हा हल्ला करण्यात आला. या घटनेनं पुणं शहर हादरून गेलं आहे. दरम्यान पुण्यातील ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये देखील गोळीबाराची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नैताळे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. बुधवारी पुण्यामध्ये गोळीबार झाला, त्यानंतर गुरुवारी नाशिमध्ये अशीच घटना घडली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
