एक तर गोळी खा, नाही तर गोळी…पवई एन्काऊंटरवर काय म्हणाले प्रदीप शर्मा ?

पवईतील एका स्टुडिओत काल १७ हून अधिक मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा काल पवई पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या प्रकरणात विविध स्वरुपाच्या प्रतिक्रीया येत आहेत. माजी एन्काऊंटर फेम पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी यावर आपले मत मांडले आहे.

एक तर गोळी खा, नाही तर गोळी...पवई एन्काऊंटरवर काय म्हणाले प्रदीप शर्मा ?
rohit arya and pradip sharma
Updated on: Oct 31, 2025 | 7:38 PM

मुंबईतील पवईतील एका स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न केले जात आहेत. या संदर्भात काहीही आरोपीच्या पायाला गोळी मारायला हवी होती असे म्हटले आहे. तर काहींनी या प्रकरणात कोर्टात जाण्याची तयारी केलेली आहे. पवईत घडलेल्या या एन्काऊंटर संदर्भात आता माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपले मत मांडले आहे.

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अंडरवर्ल्डच्या अनेक गँगस्टरचे एन्काऊंटर केले आहे. त्यांनी या संदर्भात आपले मत मांडले आहे. प्रदीप शर्मा यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या मते जे झाले ते योग्य आहे. पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १७ मुलांना वाचवलं आहे. आरोपीने सर्वत्र केमिकल्स फवारुन ठेवली होती. आग लागण्याचा धोका होता.

प्रदीप शर्मा यांनी एन्काऊंटर बद्दल विचारले असताना त्यांनी सांगितले की एन्काऊंटर ठरवून केला जात नाही, अचानक होत असतो. एकतर गोळी खा नाही तर गोळी द्या, मग पोलिस तर गोळी देणारच. १०० आयपीसी प्रमाणे पोलिसांना पॉवर देण्यात आलेली आहे. बलात्कार होत असताना, बंदी बनवले असेल, जीवाला धोका असेल तर बळाचा वापर करण्याची पॉवर कायद्याने पोलिसांना दिली आहे. तंतोतंत कायद्याच्या पालन झाल आहे असे माझा मत असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

जनता पोलिसांच्याबरोबर आहे

हा फेक एन्काऊंटर नाही. स्वतःचे पैसे वसूल करायला आरोपीने अशा प्रकारे लहान मुलांचा वापर केला हे कितपत योग्य आहे. अमोल वाघमारे याने सोसायटी, समाजासाठी हे केले आहे. १७ मुलांचा जीव वाचवला आहे. त्यांचं कौतुक करायला हवे. अशाप्रकारे कोर्टात जाणे चुकीचे आहे.आरोपीने सगळी कबुली दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला हा एन्काऊंटर जस्टीफाईड आहे. पोलिसांनी काही घाबरायची गरज नाही. जनता पोलिसांच्याबरोबर आहे असेही प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे.