राजापुरात मन हेलावणारी दुर्घटना : नाणार इंगळवाडीत खाडीत बुडून चार भावंडांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील पाच मुले खाडीच्या खोल पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना राजापुरातील नाणार इंगळवाडी येथे घडली आहे.

राजापूरात धक्कादायक घटना घडली आहे. नाणार इंगळवाडीतील खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या परिसरावर दु:खी अवकळा पसरली असून एकाच कुटुंबातील चार मुले गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे तर तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून एका मुलीचा शोध अद्याप लागलेला नाही. राजापूरातील नाणार इंगळवाडीत खाडीत कालवे काढण्याच्या कामासाठी आई-वडिलांसह खाडीच्या खोल पात्रात ही मुले उतरली होती. मात्र, खोल पाण्यात पाचही भावंडे बुडू लागली. त्यातील एका लहान मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे.
सागरी पोलीस ठाणे नाटे अंतर्गत येणाऱ्या नाणार इंगळवाडी येथे आज रविवारी दुपारी काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. खाडीत मुळे (कालवे) काढण्यासाठी आई-वडिलांसोबत पाच भावंडे पाण्यात उतरली होती. यातील एका मुलासह तिन बहिणी अशा बहिण भावांचा खाडीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी एका मुलीला वाचवण्यात यश आले, मात्र, तिघांचे भावंडांचे थेट मृतदेहच हाती लागले आहे. एका मुलीचा अद्याप शोध सुरु आहे.
एकाच कुटुंबातील पाच भावंडे आई-वडिलांना कालवे काढण्याच्या कामात मदत करण्यासाठी खाडीच्या पाण्यात उतरली होती. एकापाठोपाठ एक अशी पाचही लहान मुले खाडीच्या खोल पाण्यात ती ओढली गेली. मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामध्ये एका लहान मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले; मात्र इतर चार भावंडे पाण्याच्या खोल प्रवाहात बुडाली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात शांतता आहे.