Who Is Shivraj Motegaonkar : होम ट्युशन ते 100 कोटींचे साम्राज्य; NEET पेपर फुटीमधील शिवराज मोटेगावकर कोण? ‘RCC’ पॅटर्न सीबीआयच्या रडारवर

Who Is Shivraj Motegaonkar : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UGचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणी लातूरमधील प्रसिद्ध 'रेणुकाई करिअर सेंटर' (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांची चौकशी करण्यात आली. ते नेमके कोण आहेत? जाणून घ्या

Who Is Shivraj Motegaonkar : होम ट्युशन ते 100 कोटींचे साम्राज्य; NEET पेपर फुटीमधील शिवराज मोटेगावकर कोण? RCC पॅटर्न सीबीआयच्या रडारवर
Shivraj Mategaonkar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 18, 2026 | 4:07 PM

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट (NEET UG) परीक्षेच्या पेपरफुटीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. राजस्थानमधून सुरू झालेल्या या घोटाळ्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रातही घट्ट रुजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुणे, नांदेड आणि लातूर येथे मोठी कारवाई करत लातूरच्या प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना बेड्या ठोकल्या आहेत. सीबीआयच्या तब्बल २८ अधिकाऱ्यांच्या पथकाने लातूरमध्ये तळ ठोकून मोटेगावकरांची ८ ते १० तास कसून चौकशी केली. या चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि संशयास्पद पुरावे हाती लागल्याने अखेर ही अटकेची कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, मोटेगावकरांच्या क्लासेसने विद्यार्थ्यांना दिलेल्या ‘गेस पेपर’मधील तब्बल ४२ प्रश्न मुख्य नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे तपासात समोर आले आहे.

कोण आहे शिवराज मोटेगावकर?

आज कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या कोचिंग विश्वात नाव असलेल्या शिवराज मोटेगावकर यांचा आधीचा काळ अत्यंत संघर्षाचा आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षणासाठी ते लातूरला आपल्या मोठ्या बहिणीकडे आले. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून (नांदेड) एम.एस्सी. (केमिस्ट्री) ही पदवी पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कौटुंबिक जबाबदारी आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांनी लातूरमध्ये ‘होम ट्युशन’ (घरोघरी जाऊन शिकवणी) घेण्यास सुरुवात केली होती.

‘आरसीसी’ची स्थापना कशी झाली?

पदवी पूर्ण झाल्यानंतर मोटेगावकर यांनी उमरगा (धाराशिव) आणि लातूर येथील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (CHB) केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. केमिस्ट्री विषयावरील उत्तम पकड आणि शिकवण्याची वेगळी शैली यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली. यातूनच त्यांनी ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’च्या (RCC) माध्यमातून खासगी शिकवणीचा पाया रचला. सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषयापुरता मर्यादित असलेला हा क्लास पुढे विस्तारत गेला. “सर्व विषय एकाच छताखाली” ही संकल्पना मांडत त्यांनी नामांकित आणि तज्ज्ञ शिक्षकांना आपल्यासोबत जोडले. या दूरदृष्टीमुळे ‘आरसीसी’चा झपाट्याने विस्तार झाला आणि आज या क्लासेसची वार्षिक उलाढाल जवळपास १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे.

‘आरसीसी पॅटर्न’ आणि डिजिटल क्रांतीचा गैरफायदा?

गेल्या २३ वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोटेगावकरांनी लातूरमध्ये स्वतःचा ‘आरसीसी पॅटर्न’ विकसित केला होता. नीट परीक्षेत त्यांच्या क्लासेसचे शेकडो विद्यार्थी यशस्वी होत असल्याचा दावा नेहमी केला जात असे. “आमच्या क्लासच्या नोट्स आणि गेस पेपर्समधील प्रश्न नीट परीक्षेत जसेच्या तसे येतात,” अशी आक्रमक जाहिरातबाजी मोटेगावकर स्वतः करायचे.

कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व काही बंद होते, तेव्हा त्यांनी ऑनलाईन शिक्षण आणि आक्रमक डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपले जाळे अधिक मजबूत केले. याद्वारे आरसीसी लातूरपुरती मर्यादित न राहता नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि थेट पुण्यापर्यंत पोहोचली. मात्र, ज्या ‘गेस पेपर’च्या जोरावर आरसीसीने हजारो विद्यार्थ्यांना आकर्षित केले, त्याच गेस पेपरमधील ४२ प्रश्न थेट नीट परीक्षेत मॅच झाल्याने आता हा यशाचा आलेख की पेपरफुटीचा पूर्वनियोजित कट, या संशयाने सीबीआयने या संपूर्ण साम्राज्याला आपल्या चौकशीच्या फेऱ्यात घेतले आहे.

Follow Us