Ganesh Festival: परळच्या गणपती कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपापल्या मंडळाकडे रवाना

गणेशोत्सवाला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी या उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईतील परळच्या गणपती कार्यशाळेतून गणेश मूर्ती आपापल्या मंडळाकडे जाण्यास सुरुवात झाली आहे.

Ganesh Festival: परळच्या गणपती कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपापल्या मंडळाकडे रवाना
Ganpati Bappa
| Updated on: Aug 03, 2025 | 8:35 PM

गणेशोत्सवाला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी या उत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे यादिवशी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत, त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन होणार आहे. आता मुंबईतील परळच्या गणपती कार्यशाळेतून गणेश मूर्ती आपापल्या मंडळाकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मुंबईच्या परळ वर्कशॉपमधून अनेक गणेशमूर्ती आपापल्या मंडपात दाखल झाल्या आहेत. गणपती मंडळाकडे जाताना मुंबईच्या रस्त्यांवर गणपतीची आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मिरवणूकीच्या काळात ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये याची मुंबई पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली होती.

मुंबईत धारावीचा विघ्नहर्ता आणि सुंदर बागच्या राजाचा आगमन सोहळा दिमाखात पार पडला. या आगमन सोहळ्यामध्ये बच्चे कंपनी तसेच मंडळातील कार्यकर्त्यांची गर्दी पहायला मिळाली. यावेळी काळजीपूर्वक मूर्तीला मंडपात आणण्यात आले.

मुंबईसह देशातील विविध भागात परळमधून गणेशमूर्ती पाठवल्या जातात. सुरत येथील आराध्यराज गणपतीही परळच्या वर्कशॉप येथून रवाना झाला. लांब सोंड आणि सिंहासनावर ऐटीत बसलेला गणराज बघून सर्व भाविक मोहित झाले. आराध्यराज गणपती 300 किलोमीटरचा प्रवास करून जाणार यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

मुंबईतून गुजरातच्या सुरतसाठी आणखी एक गणेशमूर्ती रवाना झाली. सुरतच्या विघ्नेश्वर या मंडळातील बाप्पा सुरतकडे रवाना झाले आहेत. अतिशय मनमोहक आणि सुंदर असलेला सुरतच्या विघ्नेश्वर बाप्पाला पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले.

एकीकडे सार्वजनिक मंडळांच्या मोठ-मोठ्या गणपतींचे आगमन सुरू झाल आहे. तर दुसरीकडे घरगुती गणपती घेण्यासाठी नागरिक बाजारात दाखल झाले आहेत. छोट्या आणि सुबक मूर्त्या पाहून भाविकांचे मन मोहून जात आहे. लालबाग येथील सुनील गणेश आर्टस् येथे यंदा अनेक नवनवीन गणेश मूर्त्या दाखल झाल्या आहेत. बटरफ्लाय गणराज, कृष्ण रुपातील मूर्ती, नाखवा रुपातील गणेश मूर्ती यंदाचे प्रमुख आकर्षण असल्याचे पहायला मिळत आहे.