
Ganesh Visarjan 2024 : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ याच जयघोषात दीड दिवसांच्या बाप्पााला आज निरोप दिला जाणार आहे. आज दीड दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघणार आहेत. भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणारा गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दीड दिवसांच्या गणपतींना रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपण गणपती विसर्जनाची शुभ वेळ काय? याबद्दल जाणून घेणार आहोत.
यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले. यानंतर आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती बाप्पाची स्थापना चतुर्थी तिथीला दुपारी होते. त्यानंतर दुपारी विसर्जन करण्यात येते. त्यामुळे याला दीड दिवसात गणेश विसर्जन असे म्हटलं जातं.
यंदा दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि शुभ वेळ समोर आली आहे. दुपारी साधारण 2 च्या नंतर संध्याकाळपर्यंत गणेश विसर्जनाचा मुहुर्त असणार आहे.
अभिजीत मुहूर्त 11:53 ते 12:43 मिनिटांपर्यंत
विजय मुहूर्त – 2:24 ते 3:14 मिनिटांपर्यंत
संध्याकाळी मुहूर्त – 6:34 ते 7:43 मिनिटांपर्यंत
जर तुमच्या घरी आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन असेल तर तुम्ही या नियमांचं पालन केलं पाहिजे. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना नेहमी शुभ मुहुर्त पाहावा. गणपतीची पूजा करताना गणपतीला दाखवलेले सर्व साहित्याचे विसर्जन करावे. जर तुम्ही गणपतीला नारळ दाखवला असेल तर तो फोडू नये. त्या नारळाचंही विसर्जन करावं. तसेच विसर्जनावेळी गणपती बाप्पााला मोठ्या थाटामाटात निरोप देत पुढच्या वर्षी नक्की या, अशी सादही घालण्यास विसरु नये.