
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे (Anant Garje) याच्या पत्नीने, गौरी (Dr. Gauri Palve-Garje) हिने शनिवारी संध्याकाळी मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. याप्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली असून दररोद नवनव्या घडामोडी , अपडेट्स समोर येत आहेत. गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गौरीचा पती अनंत व कुटुंबियांवोराधत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्यूनंतर 24 तासांनी , म्हणजेच काल (रविवारी) मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली. मात्र त्याच्या कुटुंबियांतील इतर दोघांविरोधातही गुन्हा दाखल असून त्यांना अटक झाली की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
दरम्यान डॉ. गौरी पालवी-गर्जे मृत्यूप्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. गौरीने शनिवारी संध्याकाळी राहत्या घरात आत्महत्या केली होती. मात्र तिच्या मृत्यूच्या आधी, अवघ्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंतचे भांडण झाले होते अशी माहिती उघड झाली आहे. अनंत गर्जेच्या चौकशीत ही माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितल्याचे समजते. यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळू शकतं, अनंतच्या चौकशीतून अनेक महत्वाचे खुलासे होऊ शकतात.
गाडी कोस्टल रोडवर अन् वारंवार फोन… काही मिनिटात काय काय घडलं ?
शनिवारी संध्याकाळी अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले. मात्र त्याचा काही वेळ आधीच त्यांचं व गौरी गर्जे हिचं भांडण झालं, त्यानतंरही अनंत हे घराबाहेर निघून गेले होते. त्यांची गाडी कोस्टल रोडवर असतानाच अनंत हे गौरीशी बोलण्यासाठी तिला फोन करत होते, तिने एकदा फोन उचलला नाही म्हणून ते तिला वारंवार फोन करू लागले. पण गौरी यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, फोनही उचलला नाही, त्यामुळे अनंत यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी गाडी पुन्हा घराच्या दिशेने वळवली.
त्यानंतर ते घरी जाऊन बेल वाजवू लागले, दार ठोठावू लागले, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. आतमधून कोणताच आवाज नाही, काही प्रतिक्रिया नाही हे कळल्याने अखेर अनंत यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले आणि त्यांच्या पायाखलाची जमीनच सरकली. समोर त्यांची पत्नी गौरी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळली आणि ते हादरलेच.
पोलिसांनी अटक केल्यानंतर अनंत गर्जेची चौकशी करण्यात येत असून त्यातूनच हा सगळा घटनाक्रम समजल्याचे, ही माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितलं.
गौरीच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार, नातेवाईकांमध्ये बाचाबाची
दरम्यान डॉ. गौरी पालवे-गर्जे हिच्या पार्थिवावर आज अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. गौरी हिचं पार्थिव मोहोज देवढे गावात दाखल झालं आहे, मात्र सध्या तिथे तणावपूर्ण वातावरण आहे. गौरी हिची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या झाली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे. तिचं पार्थिव गावात दाखल झाल्यावर अत्यंत शोकाकु वातावरण आहे. याच दरम्यान गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे.