सर्वत्र ग्रामंपचायतीची रणधुमाळी सुरु, चंद्रपूरच्या घुग्घुस गावाचा बहिष्काराचा निर्णय, काय कारण?

| Updated on: Jan 15, 2021 | 8:04 PM

घुग्घुस गावातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. (Ghughus village of Chandrapur)

सर्वत्र ग्रामंपचायतीची रणधुमाळी सुरु, चंद्रपूरच्या घुग्घुस गावाचा बहिष्काराचा निर्णय, काय कारण?
घुग्घुस ग्रामपंचायत
Follow us on

चंद्रपूर: राज्यातील 14 हजार 232 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी तहसीलदार कार्यालयांमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला. मात्र, राज्यातील एक गाव असं आहे, त्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळालेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुसवासियांनी त्यांच्या मागणीसाठी एकी दाखवून इतिहास घडवला आहे. घुग्घुस गावातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. नगरपरिषद अधिसूचना जारी झाल्यानंतरही ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी नगर परिषद स्थापनेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अधिकृत होकार दर्शवला आहे. घुग्घुस ग्रामंपंचायत निवडणूक बहिष्काराची सद्यस्थिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. (Ghughus village of Chandrapur not participate in Gram Panchayat Election)

घुग्घुसगावाकडून एकीचं दर्शन

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस या औद्योगिक शहरातील नागरिकांनी अनोख्या एकीचे दर्शन घडवले. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. 25 वर्षांपासून या शहरात नगर परिषद स्थापनेची मागणी आहे. मात्र, ती पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी हे पाऊल उचलले. जिल्हा प्रशासनाने ही या बद्दलचा अहवाल निवडणूक आयोगाला कळवला आहे.

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या औद्योगिक नगरी घुग्घुस शहरात नगरपरिषद स्थापनेसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी एकजुट झाले आहेत. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस हे शहर कोळसा- सिमेंट आणि कच्च्या लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमुळे व त्याच्या प्रदूषणामुळे सतत चर्चेत असते. (Ghughus village of Chandrapur)

नगरपरिषदेसाठी 25 वर्षे लढा

गेली 25 वर्षे इथले नागरीक नगरपरिषदेच्या स्थापनेसाठी न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून संघर्ष आणि चळवळ करत होते. 31 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शहरात नगरपरिषद स्थापनेसाठी प्राथमिक अधिसूचना जारी केली होती. नगरपरिषद स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असतानाच नुकत्याच राज्य शासनाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या कार्यक्रमात घुग्घुसचाही समावेश करण्यात आला.

राज्य सरकारच्या या अन्यायी धोरणामुळे संतापलेल्या घुग्घुसकरांनी निवडणुकीवर बहिष्काराचे अस्त्र उगारले. 24 डिसेंबरपासून विविध आंदोलनांची मालिका राबवून त्यांनी आपली मागणी रेटून धरली. घुग्घुस शहराच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नगरपरिषद स्थापन करा, अशी अधिकृत भूमिका जाहीर केली. पंचायत समिती सदस्य काँग्रेसच्या रंजीता आगदारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, घुग्घुस ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपेंपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 17 सदस्यांची ही ग्रामपंचायत आता प्रशासकाच्या अधीन राहणार आहे. सर्वपक्षीय बहिष्कारामुळे उदभवलेली स्थिती प्रशासनाने निवडणूक आयोगाला कळविली आहे, अशी माहिती चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गोंड यांनी सांगितले.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रत्यक्ष प्रचार सुरू झालाय. मात्र, घुग्घुसकरांनी ठाम निर्धार करत नगर परिषद स्थापनेसाठी एकजूट दाखवलीय. राज्य सरकार याची कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

राजकारणाचा अजब डाव : हर्षवर्धन जाधव Vs पत्नी संजना जाधव Vs मुलगा आदित्य जाधव

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?

(Ghughus village of Chandrapur not participate in Gram Panchayat Election)