विनायक राऊत यांना अटक होणार? सून गिरीजा राऊतांच्या वकिलांच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ

girija raut : गिरीजा राऊत यांच्या वकिलांनी माजी खासदार विनायक राऊत यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वर्तुलात खळबळ उडाली आहे.

विनायक राऊत यांना अटक होणार? सून गिरीजा राऊतांच्या वकिलांच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ
| Updated on: Jul 12, 2026 | 12:41 PM

गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊत, सासरे विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कौटुंबिक छळ आणि जादूटोणाचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. राऊत कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज रविवारी गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांच्या वकिलांनी थेट विनायक राऊत यांच्या अटकेची मागणी केली. वकिलांच्या मागणीनंतर आता विनायक राऊत यांना अटक होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

गिरीजा राऊत यांच्या वकिलांनी प्रकरणाची माहिती देताना म्हटलं की, ‘पोलिसांनी 498 कलमांतर्गत जुना गुन्हा दाखल केला. फसवणूक, नरबळी सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गुन्हे अजामिनपात्र आहे. त्यामुळे आम्ही अटक करण्याची मागणी केली आहे. मुलाची क्षमता त्यांना माहीत होती. त्यामुळे त्यांनी गरीब कुटुंब शोधलं आणि मागणी घातली. त्यांनी खोटं सांगून लग्न केलं. त्यांनी फसवणूक केली असून अघोरी कृत्य देखील केलं आहे’

‘एका फ्लॅटवर एका बाबाला बोलावलं. कुर्ल्याचा बाबा आहे. त्यांनी मानसिक दबाव आणण्याचं काम केलं. तुमच्यातच कमी आहे, असं म्हणत कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. ती इतक्या दिवस शांत राहिली होती. तिला राजकीय भीती होती. कारण सासरे खासदार आणि नवरा नगरसेवक होता. त्यामुळे घाबरत होती. माझ्याकडे आल्यावर मी तक्रार करायला सांगितली, असं त्यांनी सांगितले.

‘आता या प्रकरणात विनायक राऊत यांना त्वरीत अटक करावी, असे नेते असतील तर कसं व्हायचं? नेतृत्व करणारे असे लोक आहेत,. आरोपींना अटक करावी, या प्रकरणात एकूण सात आठ आरोपी आहेत. त्या सर्वांना अटक करावी, त्याशिवाय पर्याय नाही. आता पोलीस चौकशी करत आहेत. सर्व मोठी लोक आहेत. त्यामुळे पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे. गिरीजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन वकिलांनी केलं.

Follow Us