धुळ्याच्या अपघातग्रस्त भाविकांच्या मदतीला सरकार धावलं; तातडीने सूत्रे हलवली, मंत्री गिरीश महाजन…
धुळ्याच्या अपघातग्रस्त भाविकांच्या मदतीला सरकार धावलं आहे. अपघाताच्या घटनेनंतर तातडीने सूत्रे हलवली आहेत. अपघातानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी अपघाताचा आढावा घेतला आहे.

राजस्थानच्या कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ धुळ्यातील भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघतात 9 जणांचा मृत्यू झाला. यात अनेक जण गंभीर जखमी झाले. यात अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातून सूत्रे हलवली. राजस्थानमधील कोटा येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत मदतकार्याचा आढावा घेतला.
राजस्थानच्या कोटामध्ये खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन धुळ्यात जिल्ह्यात परतताना भाविकांच्या वाहनाची महामार्गावर उभ्या असलल्या ट्रकला जोददार धडक बसली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अपघाताच्या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी कोटामध्ये जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दुरध्वनीवरून संवाद साधला. जखमींना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार अधिक चांगल्या आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मंत्री गिरीश महाजनांनी राजस्थानमधील पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधलाय. या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम, जखमींची प्रकृती, सुरू असलेले उपचार आणि मदतकार्याची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे पार्थिव देह लवकरात लवकर त्यांच्या मूळ गावी आणण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व वाहतूक व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देशही महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल . अपघातातील जखमींना तातडीने आणि दर्जेदार उपचार मिळणे, मृतांच्या पार्थिवांना सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासन या दुःखद प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली.