
राज्यात सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून विजयासाठी सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी कंबर कसून तयारी करत आहेत. प्रचाराचाही धडाका सुरू झाला असून वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे. एकंदरच सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तापलेलं दिसत आहे. मात्र या धामधुमीत, प्रचारसभांमध्ये काहीतरी वेगळं, कधी मजेशीर घडत असतं. बोलता बोलता ही ध चा मा होता आणि वेगळाच अर्थ निघतो, सर्वांच्या भुवया उंचावतात. असंच काहीस गोंदिया येथए घडलं. तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची सभा सुरू असतानाच एकाने केलेल्या विधानामुळे अजब प्रकार घडला. कमळाचे बटन दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा असं विधान, राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीन केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ही चूक लक्षात येताच ती सावरूनही घेण्यात आली, माफीही मागितली. मात्र तोपर्यंत या चुकीच्या विधानाच व्हिडीओ रेकॉर्ड झाला आणि सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला.
नेमकं झालं तरी काय ?
गोंदिया नगर परिषदेमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वहात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे गोंदिया जिल्ह्यात आणि भंडारा जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत, ते विविध वॉर्डात सभा घेत आहेत. अशातच गोंदियाच्या 6 क्रमांक वॉर्डमध्ये ते सभा घेत असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे पती खलील पठाण हे सभेला संबोधित करत होते. मात्र त्यावेळी बोलताना त्यांच्या तोंडून एक वेगळंच विधान निघालं. नगर परिषदेमध्ये “कमळ चिन्हावर बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा ” असं वाक्य त्यांच्या तोंडून निघालं. मात्र ते ऐकून सर्वांचे कान टवकारले, अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर खलील पठाण यांनाही त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी लगेच माफी मागितली आणि अनावधनाने असे वक्त्वय झाल्याचे सांगितले. पण तोपर्यंत बाण सुटला होताच. हा सर्व प्रकार सभेला आलेल्या लोकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला होता, व्हिडीओही शूट झाला.
बघता बघता हा व्हिडीओ सगळीकडे पसरला, तो व्हिडीओ, ते वक्तव्य सध्या गोंदिया जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या सभेदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल हे सुद्धा मंचावर होतेच, त्यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने विविध चर्चा सुरू झाल्या असून खळबळही माजली.