
शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने उन्हाळ्याचे तीन महिने वन पर्यटनाचा हंगाम असे म्हणता येते. यामुळेच नवेगाव अभयारण्यात सध्या जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसत आहे. अभयारण्य पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान 133.880 चौरस किमी, नवेगाव वन्यजीव अभयारण्य 122.756 चौरस किमी, नागझिरा वन्यजीव अभयारण्य 152.810 चौरस किमी, नवीन नागझिरा अभयारण्य 151.335 चौरस किमी आणि कोका वन्यजीव अभयारण्य 97.624 चौरस किमी क्षेत्र मिळून तयार झाले आहे.
यात बकी गवत कुरण 56 हेक्टर आर क्षेत्रात कालीमाती गवत कुरण 68 हेक्टर आर क्षेत्रात तर कवलेवाडा गवत कुरण हे 100 हेक्टर क्षेत्रात व्यापले आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने नवेगाव अभयारण्यात सध्या चांगलीच गर्दी वाढली आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यालगत असलेल्या नवेगाव अभयारण्यात जाण्यासाठी खोली गेट, बकी गेट आणि जांभळी गेट सुरू आहेत. येथून सकाळ फेरीत आणि दुपारच्या फेरीत पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगत असलेल्या बकी गेटमधून आत पर्यटनासाठी गेले. तेव्हा नीलगाय, सांबर, चितळ, अस्वल, बिबट, रानकुत्रे, चौसिंगा, मोर, रानडुक्कर, भेडकी, वाघ इत्यादी प्राणी हमखास पाहायला मिळतात.
बकी गेटमधून आत निसर्गाचा आनंद घेत असताना जांभूळझरी, बदबदा, तेलनझरी, गोपीचूहा, आगेझरी, थाटरेमारी, सालाई झरी असे विविध नैसर्गिक आणि कृत्रिम झरे पाहायला मिळतात. बकी गेट येथे पर्यटकांना पर्यटनाची इत्यंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षित गाईडची सुविधा केली आहे. नवेगाव अभयारण्यात काळीमाती, टिके जॉईंट, रांजीटोक असे आकर्षक कॅम्प तयार करण्यात आले आहेत. सध्या वाघाचे दर्शन होत असल्याने तिन्ही गेट हाऊसफुल्ल सुरू असल्याचे चित्र नवेगाव अभयारण्यात पाहायला मिळत आहे.
परंतु, नागझिऱ्याला लागून असलेल्या गावांची परिस्थिती भीषण आहे. गावाला लागून कोअर झोन तयार करण्यात आला. ईडीसी (इको डेव्हलपमेंट समिती) कायदावर राहिल्या आहेत. आधी जंगलावर निर्भर असलेले युवक रोजगारासाठी शहरात जात आहेत. वन्यप्राणी शेतात येऊन नुकसान करत आहेत. याकडे नागझिरा वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. कोअर झोनला लागून असलेल्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे वन्यजीव आणि वनविभागाला काही घेणेदेणे नाही.
वन्यजीव विभागाकडून प्राण्यांची काळजी केली जात आहे. पण, कोअर झोनला लागून असलेल्या गावांतील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणालाही वेळ नाही.नागझिऱ्यालगत असलेल्या आतेगाव येथील सुमारे १०० तरुण रोजगारासाठी बाहेर गेले आहेत. इतर कोअर झोनला लागून असलेल्या गावांची परिस्थिती याहून वेगळी नाही. प्राण्यांना जगवा आणि माणसांना भटकंती करायला लावा, अशी वन्यजीव विभागाची नीती आहे.