नातेवाईकाच्या लग्नासाठी मोटारसायकलवरुन गेले होते, मात्र घरी परतत असतानाच काळाने घाला घातला !

नातेवाईकाच्या लग्नाला तीन मुलांसह बाप दुचाकीवरुन गेला. लग्न समारंभ आटोपून पुन्हा घरी परतत होते. मात्र परतीच्या वाटेवर असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

नातेवाईकाच्या लग्नासाठी मोटारसायकलवरुन गेले होते, मात्र घरी परतत असतानाच काळाने घाला घातला !
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 01, 2023 | 4:49 PM

गोंदिया / शाहिद पठाण : नातेवाईकाच्या लग्नाहून घरी परतत असताना भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या धडेकत मोटारसायकलवरील तीन मुलांसह बापाचा करुण अंत झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. गोंदियाच्या रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ठाकनी भागवत टोला रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

नातेवाईकाच्या लग्नाहून घरी परतत होते

दासगावहून पीडित कुटुंबीय नातेवाईकाच्या लग्नासाठी गोंदियातील पिंकेपार येथे गेले होते. लग्न सोहळा आटोपून तीन मुलांसह वडिल आपल्या मोटारसायकलहून दासगावला आपल्या घरी परतत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरी परतत असतानाच ठाकनी भागवक टोला रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलला ट्रकने धडक दिली.

तिघांचा जागीच मृत्यू, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

धडक इतकी जोरदार होती की वडिल आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. एका मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर ट्रकचालक फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रामनगर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.