
Gopichand Padalkar : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. याआधी त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. असे असतानाच आता अहिल्यानगरातील एका सभेत पडळकर यांनी मोठे विधान केले आहे. मुस्लीम भारताला युद्धाचं घर मानतंत असं डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, असा खळबळजनक दावा पडळकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटू शकते. मुस्लिमांना राष्ट्र प्रथम नाही तर इस्लाम प्रथम आहे, असेही पडळकर म्हणाले आहेत.
“जी मुस्लीम राष्ट्रे आहेत, ते मुस्लिमांना इस्लामचं घर वाटतं. जे देश मुस्लीम राष्ट्रं नाहीत ते मुस्लिमांना युद्धाचं घर वाटतं. म्हणजेच मुस्लिमांसाठी भारत हा देश युद्धाचं घर आहे, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहून ठेवले आहे, त्यात तसे लिहिण्यात आले आहे,” असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच जगातले मुस्लीम जी भूमिका घेतात त्या भूमिकेला भारतातील मुस्लीम प्राधान्य देतात, असेही विधान पडळकर यांनी केले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांच्या आई-वडिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून पडळकरांचा निषेध करण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले होते. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या आई-वडिलांच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना समज दिली होती. तरीदेखील पडळकर यांनी पुढच्या काही भाषणांत जयंत पाटलांवरील टीका कमी केली नव्हती.
आता जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा मुद्दा मागे पडलेला असताना पडळकर यांनी नवे विधान केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा हवाला देत त्यांनी मुस्लीम धर्मीयांबद्दल विधान केले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.