
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला, खासदार संजय राऊतही त्यांच्यासोबत उपस्थित होते. काल ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी भेट घेऊन, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांना धीर दिला. मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचली नसल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला. तसेच मतदारसंघ पाण्यात असतानाही तिथे न थांबात, पुण्यात गेलेल्या तानाजी सावंत यांच्यावर राऊतांनी टीकास्त्र सोडलं. पीएम केअर फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची मागणी आहे. दिवाळीच्या आधी जनतेला , शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर जनतेबरोबर रस्त्यावर उतरू असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचं राऊत म्हणाले.
दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राऊत यांनी दिला. जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर या विषायवर 11 ऑक्टोबरला शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असंही राऊतांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल. यापूर्वी 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थिती ते शिबीर घेणं शक्य नाही. म्हणून सर्व जिल्ह्यातून शेतकरी एकत्र येणार होते, त्याचं रुपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवावा असं ठरलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
सरकार असंवेदनशील , राऊतांची टीका
सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासनही त्यापेक्षा असंवेदनशील आहे, प्रशासनावर कोणताही धाक नाही . धाराशिवमध्ये पाऊस, पुरामुळे शेतकरी रडत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावरूनच राऊतांनी ही टीका केली. सरकारने आम्हाला तुटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत की ती मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही , ते आमचा छळ करतील अशी शेतकऱ्यांनी भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.
अनेक निकष लावून, आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची ते काळजी घेतील. त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे अधिकारी आहेत जे नाचतात, बागडतात. लोकं तिथे पाण्यात आहेत, उपाशी आहेत. काही वाहून गेलेत, आणि हे इथे नाचताहेत, अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल राऊतांनी विचारला.