
सिख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 350व्या शहादत समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 आणि 25 जानेवारी रोजी भव्य व दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव आणि उदासी — असे नऊ समाज-संप्रदाय नांदेडमध्ये एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या त्याग, बलिदान आणि मानवतेसाठी दिलेल्या शहादतीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे हा आहे.
धर्म, राष्ट्र आणि मानवतेसाठी आपले प्राण अर्पण करणारे महापुरुष इतिहासात सदैव अमर राहतात. अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश पसरतो. अशाच अमर गाथांपैकी एक प्रेरणादायी कथा म्हणजे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांची, ज्यांना संपूर्ण विश्व भारतभूमीचे रक्षक म्हणून स्मरण करते. धर्मस्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले त्यांचे बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे. मुघल बादशहा औरंगजेबाच्या आदेशाने त्यांना आग्र्यात बंदी बनवून दिल्लीला आणण्यात आले, जिथे त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आला. मात्र त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. इ.स. 1675 मध्ये दिल्लीतील चांदणी चौक येथील शीशगंज येथे त्यांचे शिरच्छेद करण्यात आले.
10 लाख भाविक राहणार उपस्थित
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये सुमारे 10 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या संदेशातून श्री गुरु तेग बहादुर जी यांना अभिवादन करून अधिकाधिक संख्येने कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
शहादत समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादुर जी यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये एकत्र येणार आहेत. या प्रसंगी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव आणि उदासी — हे नऊ समाज-संप्रदाय एकत्र येतील.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 26 विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. अंदाजे 10 लाख भाविकांचा विचार करून कडक सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सोयी-सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात येत आहे.
युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्ता, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.