गणेशभक्तांसाठी मोठी खुशखबर! सरकारचा टोलमाफीचा निर्णय, कुणाला होणार फायदा?

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशभक्तांच्या प्रवासासाठी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध महामार्गांवर टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशभक्तांसाठी मोठी खुशखबर! सरकारचा टोलमाफीचा निर्णय, कुणाला होणार फायदा?
Toll Free for Ganesh Festival News
Image Credit source: Google
| Updated on: Sep 08, 2026 | 6:56 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध महामार्गांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा, यासाठी शासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी याबाबत माहिती दिली.

या टोलमाफीचा लाभ मुंबई–बंगळूर महामार्ग (NH-48) आणि मुंबई–गोवा महामार्ग (NH-66) वरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मिळणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) संबंधित मार्गांवरही गणेशभक्तांना टोलमाफीची सवलत लागू राहणार आहे. अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ पासची व्यवस्था

टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांसाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ असा स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केलेले असेल. हे पास पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, कोकणात जाताना घेतलेला पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना परतीच्या प्रवासातही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

एसटी बसेसलाही टोलमाफी

कोकणात जाणाऱ्या एसटी बसनाही पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. एसटी बससाठी पोलीस आणि RTO यांच्या समन्वयातून पासची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या एसटी बसलाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि इतर शहरांमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होतात. त्यामुळे महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि MSRTC यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच गणेशभक्तांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन केले जाणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us