दूरदर्शनवरील ब्लॉकबस्टर मालिका, जिच्या प्रसिद्धीमुळे रेल्वेने बदललं स्टेशनचं नाव, आजही प्रचंड चर्चेत
दूरदर्शनवरील ब्लॉकबस्टर मालिका, जिच्या प्रसिद्धीमुळे रेल्वेने जिथे शूटिंग पार पडलं तेथील स्टेशनचं नाव बदलून दिलं मालिकेचं नाव. आजही स्टेशनचं नाव प्रचंड लोकप्रिय.

एक काळ असा होता, जेव्हा घराघरात मनोरंजनाचं एकमेव मोठं माध्यम म्हणजे दूरदर्शन. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘वागळे की दुनिया’, ‘कृषी दर्शन’, ‘चित्रहार’, ‘रंगोली’ आणि ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ यांसारख्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. याच काळात आलेल्या एका मालिकेने मात्र प्रेक्षकांच्या मनात अशी खास जागा निर्माण केली की, आजही तिची आठवण एका रेल्वे स्थानकाच्या नावातून जपली जाते. ही मालिका म्हणजे ‘मालगुडी डेज’.
1986 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘मालगुडी डेज’मध्ये छोट्या-छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कथा पाहायला मिळाल्या. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या 1943 मधील कथासंग्रहावर ही मालिका आधारित होती. कन्नड अभिनेते आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. साध्या माणसांचं आयुष्य, त्यांच्या समस्या, नाती आणि रोजच्या जगण्यातील गंमती-जमती अत्यंत सहजपणे मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
‘मालगुडी डेज’ची लोकप्रियता आजही कायम
या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज तिच्या IMDb वरील 9.4 रेटिंगवरून लावता येतो. मालिकेसाठी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनीही योगदान दिलं होतं. टी. एस. नरसिम्हा यांनी मालिकेची निर्मिती केली तर संगीताची जबाबदारी एल. वैद्यनाथन यांनी सांभाळली.
मालिकेची लोकप्रियता इतकी मोठी होती की, 2006 मध्ये पुन्हा 15 भागांची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचं दिग्दर्शन कविता लंकेश यांनी केलं होतं. 1986 ते 2006 या काळात ‘मालगुडी डेज’चे विविध भाग आणि पुनरागमन प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मास्टर मंजुनाथ, गिरीश कर्नाड, वैशाली कासारवल्ली, देवेन भोजानी आणि बी. जयश्री यांसारख्या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
रेल्वे स्थानकाला दिलं ‘मालगुडी’चं नाव
‘मालगुडी डेज’च्या लोकप्रियतेची सर्वात वेगळी आठवण म्हणजे कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील अरासालू रेल्वे स्थानक. मालिकेचं चित्रीकरण या परिसरात झालं होतं. मालिकेच्या लोकप्रियतेमुळे आणि तिच्या आठवणी जपण्यासाठी भारतीय रेल्वेने या स्थानकाचं नाव ‘मालगुडी रेल्वे स्टेशन’ करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे काल्पनिक ‘मालगुडी’ या गावाची आठवण आजही या रेल्वे स्थानकामुळे प्रत्यक्षात जिवंत असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेच्या चाहत्यांसाठी हे ठिकाण आजही विशेष आकर्षणाचं आहे.
