
महामार्गावरुन लाखो रुपयांचा माल गायब करणाऱ्या टोळ्या सक्रिय असतानाच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने एक मोठी कामगिरी केली आहे. सुरत येथून मध्य प्रदेशासाठी निघालेला साड्यांचा ट्रक परस्पर गायब करून त्यातील मालाची विक्री करण्याचा चालकाचा डाव पोलिसांनी उधळून लावला. साधारण ४५ लाख रुपयांच्या साड्यांसह ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सुरत येथील एका नामांकित ट्रान्सपोर्ट कंपनीतून साड्यांचा मोठा साठा घेऊन हा ट्रक मध्य प्रदेशातील रतलामकडे रवाना झाला होता. मात्र, प्रवासादरम्यान चालकांनी संगनमत करून ट्रकचा मार्ग बदलला. माल वेळेत न पोहोचल्याने आणि चालकांचे संपर्क क्रमांक बंद झाल्याने ट्रान्सपोर्ट मालकाला मोठा धक्का बसला. हा ट्रक रतलामकडे जाण्याऐवजी महाराष्ट्राच्या दिशेने वळवण्यात आला होता. जेणेकरून निर्जनस्थळी नेऊन साड्यांची विल्हेवाट लावता येईल.
गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच ट्रकचा जीपीएस (GPS) डेटा आणि चालकांच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांना संशयित लोकेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील आंबेलोहोळ परिसरात असल्याचे कळाले. गुजरात पोलिसांचे पथक तातडीने महाराष्ट्रात रवाना झाले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला.
संभाजीनगर पोलिसांच्या सहकार्याने गुजरात पोलिसांनी आंबेलोहोळ परिसरात शोधमोहीम राबवली. एका ठिकाणी हा संशयास्पद ट्रक उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घेराव घालून ट्रकची झडती घेतली असता त्यात ४५ लाख रुपये किमतीच्या साड्यांचा साठा जसाच्या तसा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन चालकांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
जप्त केलेला ट्रक आणि मालासह दोन्ही आरोपींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुजरातला नेण्यात आले आहे. या चोरीच्या कटात आणखी कोणाचे हात आहेत का? किंवा हा माल खरेदी करण्यासाठी कोणी स्थानिक मध्यस्थ होता का? याचा तपास आता गुजरात पोलीस करत आहेत.