NCP : शरद पवार गटाला मोठी गळती, ‘या’ मोठ्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेशाचा मार्ग मोकळा

NCP : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा लवकर अजित पवार गटात प्रवेश करतील असे संकेत अप्रत्यक्षरीत्या संजय पवार यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे येईल असे चित्र दिसत असून विरोधात कोणी शिल्लक राहणार नाही, असा दावा संजय पवार यांनी केला आहे.

NCP : शरद पवार गटाला मोठी गळती, या मोठ्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेशाचा मार्ग मोकळा
काकाच्या पक्षाला पुतण्याचं खिंडार
Image Credit source: social media
| Updated on: Apr 30, 2025 | 7:29 AM

राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील रखडलेल्या प्रवाशाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. गुलाबराव देवकर यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून पक्षप्रवेशासाठी अजितदादा यांचा निरोप आल्याची माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. 3 मे रोजी दुपारी दोन वाजता मुंबईत अजित दादांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यामुळे सत्तेत राहावं यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहांनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत असल्याची भूमिका देवकर यांनी स्पष्ट केली आहे. पक्ष प्रवेशाबद्दल जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचेही यावेळी गुलाबराव देवकर यांनी स्पष्ट केलं. याचवेळी जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील इतरही माजी मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देवकर यांनी दिली आहे.

गुलाबराव पाटील कधी अतिशोक्तीची भाषा बोलत असतात. त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं. मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. कोणत्याही पद्धतीचं चुकीचं काम केलेलं नाही. कुणाच्या सांगण्यावरून नेते प्रवेश देणार नाही असं होत नसतं. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकऱ्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे, यावर अनेक दिवसांपासून गप्प असलेल्या गुलाबराव देवकर यांनी मौन सोडलं असून थेट प्रतिक्रिया दिली आहे.

कोण-कोण प्रवेश करणार?

राष्ट्रवादी अजित पवार गटात होत असलेल्या शरद पवार गटातील माजी मंत्री, माजी आमदार, पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दुजोरा दिला आहे. माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार दिलीप वाघ व महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील अजित पवार गटात प्रवेश करण्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे. पक्ष प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक पार पडली असून 3 मे रोजी मुंबईत सर्वांचा प्रवेश पार पडणार असल्याचा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले.

रोहिणी खडसे अजित पवार गटात प्रवेश करणार का?

“नाव सांगणार नाही मात्र इतर प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी हे सुद्धा संपर्कात असून त्यांचाही लवकर प्रवेश होईल, तुम्हाला दिसेलच” असा दावा संजय पवार यांनी केला आहे. रोहिणी खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल विचारल्यावर ‘आगे आगे देखो होता ..है क्या… ये तो ट्रेलर है ..पिक्चर अभी बाकी है’ अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे.