मुलाचे तिकीट कापताच गुलाबराव पाटलांचे जाहीर विधान, म्हणाले देव यापेक्षाही…
जळगाव येथील जाहीर कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलाला विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने भावूक झाले. 'नशीबात असेल तर नक्की मिळेल' असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भगवा विचार न सोडण्याचा सल्ला दिला.

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १८ जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत असतानाच, शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या मुलाला विधानपरिषदेचे तिकीट न मिळाल्याने गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
‘नसीब मे होगा तो उचलकर आयेगा…’
जळगावमधील एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याबद्दल विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी जाहीरपणे उत्तर दिले. “अनेक लोक सध्या टोमणे मारत आहेत की, तुमच्या मुलाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही. मी त्यांना एवढेच सांगतो, ‘नसीब मे होगा तो उचलकर आयेगा… और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा.’ देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काहीतरी चांगलं देण्याचं असेल, त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा.” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
भगव्या विचारांशी बांधील राहा!
मुलाला तिकीट न मिळाल्याचं दुःख बाजूला सारत गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना धीर दिला. तसेच राजकारणात निष्ठेचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात सगळं करा, राजकारण जरूर करा, पण भगव्या प्रकाशातील विचार कधीही सोडू नका.” पक्षाशी आणि विचारांशी बांधील राहणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी आपल्या भाषणातून आवर्जून अधोरेखित केले. तुम्ही गुलाबराव पाटलाला आमदार केलं, मंत्री केलं, म्हणूनच आज मी सामाजिक कार्य आणि तुमची सेवा करू शकत आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
आपल्या राजकीय प्रवासाचे श्रेय जळगावच्या जनतेला देत, जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो, अशा शब्दात त्यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गुलाबराव पाटलांनी घेतलेली ही भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.