रणवीर सिंहने या इंडस्ट्रीला उभं केलंय, त्याची खूप गरज..; बंदी हटवण्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मोठी भूमिका
अभिनेता रणवीर सिंहविरोधातील असहकाराचे आदेश अखेर मागे घेण्यात आले आहेत. विविध चित्रपट संघटनांच्या विनंती आणि हस्तक्षेपानंतर FWICE या संस्थेनं हा निर्णय घेतला आहे. यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (FWICE) अभिनेचा रणवीर सिंहविरोधातील ‘नॉन कोऑपरेटिव्ह डायरेक्टिव्ह’ (असहकाराचे निर्देश) मागे घेतलं आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने त्याच्याविरोधात फेडरेशनने हा निर्णय जाहीर केला होता. इंडियन मोशन पिक्चर असोसिएशन (IMPPA) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेतल्याचं फेडरेशनने स्पष्ट केलं. यावेळी पत्रकार परिषदेत ‘सिंटा’च्या महासचित आणि अभिनेत्री उपासना सिंहसुद्धा उपस्थित होत्या. ‘सिंटा’कडून फेडरेशनला पुनर्विचार करण्याची आणि बंदी उठवण्याची विनंती करण्यात आली होती.
काय म्हणाल्या उपासना सिंह?
“फेडरेशनने आमची विनंती ऐकून हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. कारण CINTAA हे कलाकारांचं असोसिएशन आहे. कलाकारांच्या समस्या समजून घेणं आणि त्यावर तोडगा काढणं ही आमची जबाबदारी आहे. ही फिल्म इंडस्ट्री एक कुटुंब आहे. जसं एखाद्या कुटुंबात भांडणं होतात, भावंडांमध्ये वाद होतात, तसंच इथेही होतात. त्यावर चर्चा करून, एकमेकांशी संवाद साधून तोडगा काढता येतो. आपण थेट कोर्टात जाण्याची गरज नाही. फेडरेशनने असहकाराचे आदेश मागे घेऊन खूप चांगला निर्णय घेतला आहे,” असं त्या म्हणाल्या.
याविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “कोणाचंच नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. निर्माते, दिग्दर्शक यांच्यासोबत रणवीरचंही नुकसान अजिबात होऊ नये. कारण यावेळी तो एक असा अभिनेता आहे, ज्याने या इंडस्ट्रीला उभं केलं आहे, असं मी म्हणेन. तुम्हाला माहित असेलच की किती चित्रपट फ्लॉप झाले आणि ही इंडस्ट्री कोणत्या परिस्थितीतून गेली आहे. अशा वेळी रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांनी इतिहास रचला आहे. अशा कलाकारांची या इंडस्ट्रीला खूप गरज आहे. माझ्या मुलाने ‘धुरंधर’ हा चित्रपट पाच वेळा पाहिला आहे. तो मला म्हणतो की, हा चित्रपट मी कितीतरी वेळा पाहू शकतो. एका चित्रपटामुळे कितीतरी लोकांचं घर चालतं. फक्त अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्मातेच कमवत नाहीत, तर लाइटमन, स्पॉटबॉय अशा अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. असे चित्रपट बनले पाहिजेत.”
फेडरेशनची भूमिका
दरम्यान रणवीर सिंहकडून आलेल्या नोटीसला कायदेशीर विभाग उत्तर देणार असल्याचं फेडरेशनने स्पष्ट केलं. “या सर्वांनी केलेलं आवाहन आणि चित्रपटसृष्टीचं व्यापक हित लक्षात घेता आम्ही रणवीरविरोधातील आदेश तात्काळ रद्द करत आहोत. रणवीर, एक्सेल एंटरटेनमेंट आणि सर्व चित्रपट संघटनांना एकत्र बसून हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचं आवाहन आम्ही करत आहोत. जेणेकरून कोणचीही यात फसवणूक होणार नाही. सर्व चित्रपट संघटनांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवणं, हीच आमची मूळ इच्छा होती. आम्ही रणवीरलाही आवाहन करतो की त्याने पुढे येऊन हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा. यापुढेही तो खूप मोठा स्टार बनो, अशी आमची इच्छा आहे”, असं FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित म्हणाले.
