आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर… गुलाबराव पाटलांनी भाजपलाच सुनावलं

विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी होत असल्याने महायुतीत धुसफूस निर्माण झाली आहे. संभाजी नगर आणि जळगावमधील महायुतीतील नाराजी दूर करण्यात आली आहे. मात्र, नाशिकमध्ये भाजपच्याच नेत्याने बंडखोरी केल्याने आता शिवसेना आक्रमक झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी तर भाजपच्या या बंडखोरीवरून भाजपलाच सुनावले आहे.

आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर... गुलाबराव पाटलांनी भाजपलाच सुनावलं
गुलाबराव पाटील अजूनही नाराज
| Updated on: Jun 04, 2026 | 11:55 AM

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील धुसफूस अजूनही सुरू आहे. एकीकडे अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झालेली असताना मंत्री गुलाबराव पाटील मात्र अजूनही नाराज आहे. जळगावची जागा भाजपने हिसकावून घेतल्याने गुलाबराव पाटील नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला सुनावले आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर आज ही परिस्थिती नसती, असं सुनावतानाच नााशिकमध्ये बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी योग्य नाही, असा सूचक इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. स्थानिक पातळीवर अब्दुल सत्तार यांना जे वाटतं आहे त्यांनी ते सांगितलं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे. आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असती? असा सूचक इशारा देत मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं, अशी सगळ्यांच्या अपेक्षा आहे, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

हा आमच्यावर अन्याय

आमच्या 5 सिटिंग जागा होत्या. त्यापैकी चारच जागा आम्हाला मिळाल्या आहेत. आम्ही त्या चारही जागांवर समाधान मानलं. पण तिथेही बंडखोरी होत आहे. कमी जागा घेऊनही तिथेही बंडखोरी होणार असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. असा अन्याय होता कामा नये. अशा बंडखोरी होणं मला वाटतं हे युती करता पुढच्या काळामध्ये चुकीचं आहे, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

महायुती कशी चालेल?

दोघांनी प्रामाणिकपणे काम केलं तरच चांगला रिझल्ट मिळणार आहे. जेमतेम चार जागा मिळाल्या आणि त्यावर देखील बंडखोर उभे राहत असतील तर हे योग्य नाही. दोघांनी प्रामाणिकपणे काम केलं तरच महायुती चालेल. नाहीतर महायुती कशी चालेल? कार्यकर्त्यांना समजवणार कसं? कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर बंडखोरी टाळणं महत्त्वाचं आहे. विधानसभेमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. जळगावमध्ये तर उलट बंडखोरी करणाऱ्यांना पद देण्यात आली. प्रभाकर गोटू सोनवणे यांना चार वेळा भाजप पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला, असा हल्लाच त्यांनी चढवला.

कुणाच्या मनात काय?

नाशिकमध्ये भाजपने बंडखोरी केली आहे. त्यावरूनही त्यांनी टीका केली. महायुती असताना देखील नाशिकमध्ये भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आला. आज 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे. ते काहीतरी तोडगा काढतील. कुणाच्या मनात काय आहे आपण हे कसं सांगणार? असा खोचक टोला पाटील यांनी गिरीश महाजन लगावला.

मला माहिती नाही…

शिंदे गटाचे बंडखोर उमदेवार सहलीला गेले आहेत. त्याबाबचत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी कानावर बोट ठेवलं. जळगावचा उमेदवार सहलीला गेला, याबाबत मला माहीत नाही. माहिती घेऊन मी त्यांच्याशी बोलतो. मी माझ्या कार्यक्रमात असल्यामुळे मला ह्या गोष्टीची माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तुम्हीच मातोश्रीवरून काढलं

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा आहे. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आले. त्यावर अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे हे जुने मित्र आहेत. 25-25 वर्षे झाले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी (अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे ) एकमेकांची भेट घेतली तर काय चुकीचं आहे? संजय राऊत यांनीच आम्हाला मातोश्रीवरून काढलं आणि आता तुम्हीच कशाला पुन्हा मातोश्रीवर बोलवत आहात? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us