
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विविध विकास कामांचा शुभारंभ केला. नशिराबाद येथे विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गुलाबराव पाटील आले होते. त्यांनी विविध विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच राजकीय प्रवासातील अनुभव आणि जिल्ह्याच्या विकासाबद्दल असलेली तळमळही त्यांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी जबरदस्त भाषण करत विरोधकांना टोला लगावला.
“यंदाच्या निवडणुकीत मी निवडून येणार नाही असं अनेकांना वाटत होतं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी चांगलाच कार्यक्रम केला आणि तुमच्या आशीर्वादाने मी विजयी झालो. तसेच पुन्हा मंत्री होणार की नाही याचीही शंका होती, कारण यावेळी अनेकजण स्पर्धेत होते. मलाही वाटलं की आता वय झालं, जमेल की नाही, पण तुमच्या कृपेने मला मंत्रीपद मिळालं आणि तेच खातं मिळालं.” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
“महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पालकमंत्री पदावरून वाद झाले. पण जळगाव जिल्ह्यात कोणताही वाद झाला नाही. मला विचारलं की गिरीश भाऊ पालकमंत्री झाले तर काय वाटेल? त्यावर मी उत्तर दिलं, मला आनंद होईल. सावकारे जरी झाले तरी मला काही अडचण नाही. त्यांना विचारलं तर तेही म्हणाले की गुलाबराव पाटील झाले तरी चालेल. माणसाने संयमाने आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालल्यास आणि वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे चांगले परिणाम होतात. यानंतर तुमच्या आशीर्वादाने मी दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकलो”, असाही किस्सा गुलाबराव पाटील यांनी सांगितला.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याच्या शक्यतेवर त्यांनी भाष्य केले. यावेळी प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सावध भूमिका घेतली. “एकनाथ शिंदे, अजित दादा यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या अंतर्गत विषयांवर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने बोलणे उचित नाही. त्यांचे काय बोलणे झाले आहे, यावर प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही.” असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबाबत तसेच फाईल्सला लवकर मंजुरी मिळत नाही अशी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तक्रार केल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.