
शुक्रवारी मिरा भाईंदरमध्ये मनसेची सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला, त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला, त्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका करत मोठी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
राज ठाकरेंच्या आजूबाजूला लागलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज बघितले, तर त्यांची भाषा ही असंसदीय आहे. देशाची अखंडता आणि एकात्मतेला तडा देणारी भाषा आहे. राज्या-राज्यांमध्ये भेद निर्माण करणारे हे वक्तव्य आहेत. सामान्य कष्टकरी रिक्षावाल्याला त्रास होत आहे. राज ठाकरे हे देश हिताच्या विरोधात बोलत आहेत, मुंबई पोलिसांनी कोणताही विलंब न करता राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे, आणि त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती की, राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचा लाड बंद करा. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या बाबतीत जेवढे बोलावे, जेवढी निंदा करावी, जेवढा त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. राज ठाकरे यांचे लाड बंद करावेत, देशाला, राज्याला महाराष्ट्राच्या अर्थकरणाला हे हानिकारक आहे. भाजप किंवा कोणताही राजकीय पक्ष असो मला तुम्हा सगळ्यांना आवाहन करायचं आहे की, राज ठाकरेंच्या भाषेचा तुम्ही सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे.
पोलीस आयुक्त जर राज ठाकरे यांना नोटीस देणार असतील तर ती लवकरात लवकर द्यावी, लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढला पाहिजे. मीरा भाईंदर पोलीस स्थानकाच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा गुन्हा नोंदवला पाहिजे, कायद्याप्रमाणे राज ठाकरेंना अटक केली पाहिजे, अशी मागणी यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. दरम्यान त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा राज ठाकरे यांच्यावर अशाच पद्धतीनं हल्लाबोल केला आहे, त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांना डिवचलं आहे.