
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वाहने आणि जनावरे वाहून गेली असल्याचे समोर आले आहे. पावसामुळे आलेल्या पुराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यातून पावसामुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता समोर येत आहे. पावसामुळे लातूर जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात 16 व 17 सप्टेंबर रोजी पावसामुळे अनेक अपघात घडले आहेत. जळकोट तालुक्यातील पाटोदा – माळहिप्परगा मार्गावरील नाल्यावरून जाताना ऑटो रिक्षा पुरात वाहून गेली आहे. रिक्षातून चाक प्रवासी प्रवास करत होते, यातील चालक रिक्षातून वेळीच बाहेर आला, मात्र रिक्षा इतर 3 प्रवाशांसह वाहून गेली. या तिघांचा शोध सुरु असताना विठ्ठल धोंडिबा गवळी (56) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच वैभव पुंडिलक गायकवाड (24) आणि संगीता मुहारी सूर्यवंशी (32) यांचा शोध स्थानिक पोलीस व एडीआरएफच्या पथकाकडून घेतला जात आहे.
जळकोट तालुक्यातील तिरुका गावात सुदर्शन केरबा घोणशेट्टी हा व्यक्ती मासेमारीसाठी करण्यासाठी गेला होता, मात्र तो तिरु नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. सुदर्शन यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं आहे.
निलंगा तालुक्यातील हाडोळी गावातील शेतकरी मेहबूब शेख यांची एक म्हैस वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे. तसेच मुसळेवाडी येथे ज्योतीराम दत्तात्रय जाधव यांच्याही एका म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ज्योतीराम यांच्या पत्नी सोजरबाई जाधव गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औसा तालुक्यातील उंबडगा गावात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 8 घरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
चाकूर तालुक्यातील बेलगाव येथे गणपत ज्ञानोबा माने यांची म्हैस वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे. तसेच चाकूर गावात मंगलदास दिनाजी जवाले आणि विठ्ठल माकणे यांच्या घराच्या पाठीमागे वीज पडली, त्यामुळे घराच्या भिंतीला तडे गेले आहेत. तसेच इन्व्हर्टर, बॅटरी, फॅन यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.