राज्यात अवकाळीचा तडाखा; महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, कुठे-कुठे पाऊस?

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे, राज्याला अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

राज्यात अवकाळीचा तडाखा; महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, कुठे-कुठे पाऊस?
Image Credit source: गुगल
| Updated on: May 21, 2025 | 9:37 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाचा वेग वाढला असून, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे अचानक आलेल्या या  पावसामुळे चाकरमान्यांची देखील चांगलीच धावपळ उडाली आहे.

जळगावात पावसाची हजेरी

जळगावमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे,  आज दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता, मात्र रात्रीच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली, मात्र हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये वीज देखील गूल झाल्याचं पाहायला मिळालं.

गोंदियाला पावसानं झोडपलं

गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे, याचा मोठा फटका रब्बी हंगामातील धान पिकाला बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात धानाची लागवड करण्यात आलेली असून, अनेक शेतकऱ्यांनी शेतात आपले धान कापून ठेवलेले आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतात कापून ठेवलेल्या धानाच्या पेंढ्या पावसात भिजल्यानं त्या खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 अमरावतीमध्ये पावसाचा तडाखा

दरम्यान दुसरीकडे अमरावतीमध्येही पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. अमरावती शहरामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सायंकाळी घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.  पावसामुळे संत्रा, कांदा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

हवामान विभागाकडून पावसाचा इशारा  

दरम्यान हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.