गणेश मंडळांना कोर्टाचा मोठा धक्का! ढोल ताशासोबत सिलिंडर वापरास बंदी, नियम मोडल्यास थेट जप्ती!
गणेश मंडळांना कोर्टाचा मोठा धक्का! ढोल ताशावरील टोलवाद्यांवर बंदी, नियम मोडल्यास थेट जप्ती!

कृष्णा सोनारवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यात सध्या सण उत्सवाचा काळ आहे. जागोजागी बाप्पा विराजमान झाल्याचे दिसत आहे. अनेक मोठ्या गणेश मंडळांनी आकर्षक असे देखावे साकारलेले आहेत. काही गणेश मंडळांनी आपापल्या ढोल पथकांचीही स्थापना केलीय. विशेष म्हणजे बाप्पापुढे ही ढोल पथकं वादन करताना दिसत आहेत. एकीकडे या उत्सवाची धूम सुरू असताना दुसरीकडे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातोय. लाऊडस्पीकर, डीजे यावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. दरम्यान, आता उच्च न्यायालायने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. ढोल, ताशा यांचे वादन करत असताना टोलवाद्य म्हणून सिलिंडर वापरण्यावर न्यायालयाने बंदी घातलीय. तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नियम पाळले जात नसतील तर उपकरणे जप्त करण्यात यावीत, असे निर्देश न्यायालायने राज्य सरकारला दिले आहेत.
न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला आहे?
सण, उत्सवाच्या काळात तसेच मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे तसेच उपकरणांची जप्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यावरही बंदी असेल. तसेच ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, उपकरणांची जप्ती करावी, असाही आदेश न्यायालयाने दिलाय.
मंडळांना परवानगी प्रदर्शित करावी लागेल
अगोदर ढोल, ताशाच्या पथकात एक टोलवाद्य असायचे. या टोलवाद्याची जागा आता रिकाम्या गॅस सिलिंडरने घेतली आहे. अनेक ढोल-ताशा पथकं गॅस सिलिंडरचा वापर टोलवाद्य म्हणून केला जातोय. अशा वापरावरही न्यायालयाने बंदी घातलीय. मंडळांनी प्रशासनाकडून जी परवानगी घेतलेली आहे, ती प्रदर्शित करावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितलेय.
सरकार नेमकं काय करणार?
दरम्यान, आता न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाणार, सरकार या नियमांच्या अंमलबजावणीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
