Hingoli | हिंगोलीत नणंद-भावजयीत राजकीय कलह, वर्षा गायकवाड येण्यापूर्वीच प्रज्ञा सातवांनी उरकला अनावरणाचा कार्यक्रम

| Updated on: May 17, 2022 | 11:56 AM

वर्षा गायकवाड यांना राजकीय मतभेदावर प्रतिक्रिया विचारली असता, राजकारण करण्याची ही वेळ नाहीये. माझा भाऊ मी एक वर्षांपूर्वीच गमावला असं म्हणून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Hingoli | हिंगोलीत नणंद-भावजयीत राजकीय कलह, वर्षा गायकवाड येण्यापूर्वीच प्रज्ञा सातवांनी उरकला अनावरणाचा कार्यक्रम
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंगोलीः हिंगोलीतील माजी खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राजीव सातव यांच्या मानलेल्या बहीण वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि राजीव सातव यांच्या पत्नी यांच्यातील राजकीय कलह चव्हाट्यावर आलेला दिसून आला. राजीव सातव यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री येण्यापूर्वीच आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी उरकून घेतले, तर पालकमंत्री वर्षा गायकवाड ह्या प्रज्ञा सातव यांना भेट न देताच परतल्यामुळे कार्यकर्त्यांत एकच खळबळ माजली. माजी खासदार तथा गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव यांच्या निधनानंतर सातव यांच्या एकनिष्ठतेमुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषद सदस्यत्व देत सातव कुटुंबियांच्या सोबत असल्याचे दाखवून दिलं. राजीव सातव यांनी ज्यांना बहीण मानलं त्या राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सातव कुटुंबियांच्या सतत सोबत होत्या. पण राजीव सातव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमदार प्रज्ञा सातव आणि पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात वितुष्ट निर्माण झालं ते आज दिसून आलं.

काय घडलं नेमकं?

सोमवारी  प्रथम पुण्यस्मरण दिनी राजीव सातव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते, पण पालकमंत्री वर्षा गायकवाड येण्यापूर्वीच आमदार सातव यांनी अनावरण उरकून घेतले. माजी मंत्री रजनी सातव आणि वर्षा गायकवाड हार घालून अभिवादनासाठी सातव यांच्या पुतळ्याजवळ येऊन 10 मिनिटं थांबल्या, निरोप पाठवून ही आमदार प्रज्ञा सातव पुतळा स्थळी आल्याच नाहीत. त्यानंतर हार घालून आमदार प्रज्ञा सातव यांना न भेटताच मंत्री वर्षा गायकवाड माघारी फिरल्या. त्यामुळे प्रज्ञा सातव आणि वर्षा गायकवाड यांचं चांगलंच वाजल्याचं बघायला मिळालं. यावर वर्षा गायकवाड यांना विचारलं असता हे राजकारण करण्याची ही वेळ नाहीये. माझा भाऊ मी एक वर्षांपूर्वीच गमावला असं म्हणून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

प्रज्ञा सातवांनी व्यक्त केली नाराजी..

राजीव सातव कुटुंबातील सदस्य म्हणून अनेक वर्षे वर्षा गायकवाड वावरल्या. गायकवाड यांनी पाच मिनिटं येऊन आपली भेट घ्यायला हवी होती. त्या स्टेजवर आल्या नाहीत, त्यांनी राजीव सातव यांच्याबद्दल काही बोलायला हवं होतं, तश्याच माघारी परतल्या पण आपली काही कुणाबद्दल तक्रार नाही अशा शब्दात आमदार प्रज्ञा सातव यांनी नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

मातोश्रींची सावरासावर

राजीव सातव यांच्या आठवणीने सातव यांच्या मातोश्री रजनी सातव यांना अश्रू अनावर झाले, त्यांनी दोन्ही बाजू सावरत घेत,वर्षा गायकवाड यांनी त्यांचा भाऊ गमावलाय, त्यामुळे त्यांना भरून आलं होतं, म्हणून त्या राजीव बद्दल बोलू शकल्या नसत्या.. अशा शब्दात सावरासावर केली.

हिंगोली काँग्रेसमध्ये दोनेचे आता तीन गट?

या वितुष्टमुळे हिंगोली जिल्ह्यातल काँग्रेसचे राजकारण अस्थिर झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमध्ये सातव आणि माजी आमदार भाऊराव पाटील असे दोन गट अगोदरच असतांना आता सातव आणि पालकमंत्री गायकवाड यांचे रुपयाने तिसऱ्या गटाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.