Earthquake: धक्कादायक! मराठवाड्यात भूकंपाची महामालिका, सहा वर्षांत इतक्यांदा हादरे… तज्ज्ञ श्रीनिवास औंधकरांचे मोठे आवाहन काय?
Marathwada Hingoli Earthquake: मराठवाड्यात आज पहाटे सलग चार भूकंपाचे धक्के बसले. त्याच सर्वाधिक तीव्रता 4.6 रिक्टर स्केल इतकी होती. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर आणि काकडदाबा परिसरात भूकंपाचे केंद्र होते. दरम्यान भूकंपाच्या या मालिकेवर तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी प्रशासनाला आणि सरकारला मोठे आवाहन केले आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: आज मराठवाड्यात पहाटे एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ, शिरळी रेल्वे स्टेशनजवळ याचे केंद्र बघितले गेले आहे. या भूकंपाची खोली 10 किलोमीटर आहे आणि हा धक्का 4.6 रिक्टर स्केल इतकी होती. हा पहिला धक्का बसल्यानंतर साधारणतः 2 वाजून 15 मिनिटांनी दुसरा धक्का काकडदाबा गावाजवळ बसला. त्याचीदेखील खोली 10 किलोमीटर होती. दोन मिनिटांच्या फरकाने परत 3.9 रिक्टर स्केलचा भूकंप झाला. याचे केंद्रदेखील काकडदाबा होते. त्यानंतर 3 वाजून 23 मिनिटांनी चौथा धक्का बसला. तो 4.1 रिक्टर स्केलचा होता.
सहा वर्षांत 37 पेक्षा जास्त धक्के
2020 पासून हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली या चार तालुक्यांचा विचार केला तर 37 पेक्षा जास्त धक्के बसले आहेत. यातला सगळ्यात मोठा धक्का 11 एप्रिलला 4.7 रिक्टर स्केलचा होता. एका दिवशी चार धक्के बसल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्या भागातील खनिजसंपत्तीचा काही परिणाम होतो का, पाणी भरल्यानंतर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. मागच्या वेळेस धक्का बसला तेव्हा तो अनुभव आला नाही. मात्र, यावेळेस सलग धक्के बसले, हे चिंताजनक आहे. हे सहज टाळून जमणार नाही. प्रशासनानेसुद्धा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे आवाहन तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
अभ्यास करणे आवश्यक
1993 मध्ये किल्लारीला बसलेला भूकंप 6.7 रिक्टर स्केलवर, म्हणजे खूप तीव्रतेचा होता. त्यामानाने ही तीव्रता जरी कमी असली, तरी 4.7 चा जो धक्का बसला, त्याची तीव्रता किती होती. असं म्हटलं जातं की, 1945 मध्ये नागासाकी-हिरोशिमा येथे जेव्हा बॉम्ब पडला होता, त्याची जी ऊर्जा होती, त्याच्या 15 टक्के ही ऊर्जा होती. आता 4.6 आणि 4.1 लगेच, हा अभ्यासाचा आणि चिंतेचा विषय आहे. आपत्ती व्यवस्थापनात भूकंपशास्त्र आहे की, काही सांगू शकत नाही. जेव्हा 5 रिक्टर स्केलपेक्षा अधिक भूकंपाचे धक्के होतात, ते जाणीव करण्याची यंत्रणा विकसित होऊ घातली आहे, असे औंधकर यांनी मत व्यक्त केले.
भूकंप प्रवण क्षेत्रातच लिगो प्रकल्प
लिगोची निर्मिती होताना भारतात 300 ते 350 जागा त्यासाठी निवडल्या गेल्या होत्या. त्यातून सर्वे करत करत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही जागा निश्चित केली गेली. ही जागा निश्चित करताना त्या भागात जमिनीची बाजू, म्हणजे आतापर्यंत कधी भूकंप झाला नव्हता. मात्र, 2020 पासून पुन्हा सहा-सात वर्षांत 37 धक्के त्या भागात बसले आहेत. निश्चित लिगोदेखील यावर काम करताना जो काही निर्णय घ्यायचा, तो घेईल. याच परिसराच्या 25 किलोमीटरमध्ये भूकंप होतोय, ही चिंतेची बाब आहे, याकडे तज्ज्ञ औंधकर यांनी लक्ष वेधले आहे.
काय काळजी घेतली पाहिजे?
भूकंपरोधक पद्धतीने नवीन घर बांधले पाहिजे. नागरिकांनी घाबरून न जाता आलेल्या आपत्तीला तोंड कसे देता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवेल. भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.