‘या’ कारणामुळे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 पर्यटकांचा मृत्यू

मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.

या कारणामुळे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 पर्यटकांचा मृत्यू
| Updated on: Jun 15, 2025 | 4:33 PM

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. तसेच या घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता इंद्रायणी नदीवरील हा पूल का कोसळला या मागील कारण समोर आले आहे.

6 जणांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार माहितीनुसार, आज रविवार असल्याने मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. पावसाळा असल्याने या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट देतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. मात्र हा पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20-25 लोक वाहून गेले आहे.

पुल कोसळण्यामागील कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार या भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. नदी ओलांडताना अनेक पर्यटक जीर्ण झालेल्या या पुलावर वाहने घेऊन चढले होते. त्यामुळे पुलावरील वजन वाढले आणि हा पूल कोसळला. यात अनेक लोक वाहून गेले आहेत आणि 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र 20-25 लोक वाहून गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आमदार सुनिल शेळके काय म्हणाले?

या घटनेनंतर आमदार सुनिल शेळके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले की, “या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.’