Lalbaugcha raja 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाबद्दल महत्वाची अपडेट, पहिल्याच दिवशी रांग पोहोचली थेट..
Lalbaugcha raja 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाबद्दल एक महत्वाची अपडेट आहे. दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाही राजाच्या दरबारात गर्दी उसळली आहे.

रणजीत इंगळे, प्रतिनिधी : लालबागचा राजा हा जगभरातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या पहिल्यादिवसापासून भाविकांची लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी उसळते. यावर्षी सुद्धा अशीच स्थिती आहे. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. सकाळपासून लालबागमध्ये गर्दी उसळली आहे. करीरोड, चिंचपोकळी, परेल या रेल्वे स्टेशन्सवर उतरणाऱ्या प्रवाशांची पावलं लालबागकडे वळत आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या तीन मोठ्या मंडळाचे मानाचे गणपती या भागात आहेत. त्यात नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. अगदी पहिल्यादिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी होते. यावर्षीचा अनुभव सुद्धा असाच आहे.
अगदी कालपासूनच नवसाच्या रांगेत लोक थांबले होते. लालबागच्या राजाच्या मुख दर्शनासाठी सुद्धा मोठी रांग आहे. मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात. पहाटेपासूनच भाविकांची संख्या वाढत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी रांग आहे. दर्शनासाठी भक्तांची 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत रांग आहे.
लालबागच्या राजाच्या दरबारात तोच उत्साह
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. अगदी गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, कोलकत्ता असे सर्वच भागातून भक्तगण येतात. काही नवस करण्यासाठी येतात तर काही नवस फेडण्यासाठी. दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने लालबाग राजाच्या चरणी अर्पण केले जातात. यंदाही लालबागच्या राजाच्या दरबारात तोच उत्साह दिसत आहे.
GSB गणपतीचेही विशेष स्थान
वडाळ्याच्या GSB गणपतीचेही विशेष स्थान आहे. मुंबईतील हे एक प्रसिद्ध आणि सर्वाधिक श्रीमंत गणपती मंडळ म्हणून ओळखलं जातं. यंदा या गणेशोत्सवाला तब्बल 72 वर्षांची परंपरा पूर्ण होत आहे. सर्वाधिक सोन्या-चांदीने सजवलेली या गणपती बाप्पांची मुर्ती असते. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक पद्धत आणि सामाजिक सेवेचा अनोखा संगम या गणेशोत्सवात पहायला मिळतो. धार्मिक वैदिक पद्धतीने विधी करून आज गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. GSB परंपरेतील गणपतीची सजावट आणि अलंकार हे प्रमुख आकर्षण आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजलेला बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली आहे.