15 मे रोजी अंबाजोगाईत काय घडणार? उपसरपंचाच्या एका इशाऱ्याने प्रशासन हादरले
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप उपसरपंच दत्ता साळुंके यांनी केला असून, १५ मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

एकीकडे राज्यात पर्यावरण रक्षणासाठी शासन स्तरावर मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. तर दुसरीकडे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात चक्क पोलीस प्रशासनाच्या मदतीने बेकायदेशीर वृक्षतोड केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गावठाण जमिनीच्या वादातून प्रशासनाने सत्तेचा आणि बळाचा चुकीचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. अंबाजोगाई तालुक्यातील उपसरपंच दत्ता साळुंके यांनी प्रशासकीय यंत्रणेला थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास येत्या १५ मे रोजी गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जमिनीचा वाद काय?
देवळा येथील गावठाण हद्दीत गट क्रमांक १३१ आणि १३८ या दोन जमिनींच्या तुकड्यांवरून कायदेशीर वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. उपसरपंच दत्ता साळुंके यांच्या दाव्यानुसार, न्यायालयाने केवळ संबंधित जमिनीच्या हद्दी निश्चित करण्याचे (सीमांकन) आदेश दिले होते. मात्र, पोलीस आणि महसूल प्रशासनाने या आदेशाचा विपर्यास करून, त्या जागेवर असलेली अनेक वर्षांची जुनी आणि मोठी झाडे तोडण्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुरुवात केली.
प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
त्यामुळे “झाडे लावा, झाडे जगवा” हा शासकीय नारा केवळ कागदावरच उरला आहे का? असा सवाल दत्ता साळुंके यांनी उपस्थित केला आहे. पोलीस बंदोबस्तात ही वृक्षतोड करून ती जमीन एका विशिष्ट व्यक्तीला शेतीसाठी कसण्यासाठी मोकळी करून देण्यात आली. एकीकडे वृक्ष संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, न्यायालयात प्रकरण असतानाही अशी कारवाई कोणत्या नियमांच्या आधारे केली गेली? असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पुराव्यांची मागणी आणि आंदोलनाचा पवित्रा
या संदर्भात साळुंके यांनी अंबाजोगाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांना एक सविस्तर निवेदन सोपवले आहे. या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की, पोलिसांनी ही वृक्षतोड कोणत्या लेखी आदेशाच्या जोरावर केली, त्याचे पुरावे ग्रामपंचायतीला किंवा त्यांना द्यावेत. जर ही कारवाई बेकायदेशीर असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे दत्ता साळुंखे यांनी म्हटले.
येत्या १५ मे पर्यंत ही मुदत असून आता ती जवळ येत असल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे. उपसरपंचांसारख्या लोकप्रतिनिधीने आत्मदहनाचा इशारा दिल्याने गावकरी देखील आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार की प्रशासन याकडे दुर्लक्ष करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.