IMD Rain Forecast : आता महाराष्ट्रावर तीन मोठी संकटं, पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट

महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. दरम्यान पुढचे 24 तास धोक्याचे असून, राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

IMD Rain Forecast : आता महाराष्ट्रावर तीन मोठी संकटं, पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2025 | 8:52 PM

महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून, चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली असून, त्याचा मोठा फटका हा शेतीला बसला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, शेतांना नदीचं स्वरुप आलं आहे, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान पुढील तीन दिवस राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान संकट अजून टळलं नसून हवामान विभागाकडून मंगळवारी देखील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच कोकण आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उद्या कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रति तास 50-60 किमी राहण्याची शक्यता आहे, तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असल्यानं जोरदार पाऊस, वादळ आणि विजा असं तिहेरी संकट आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. आज पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे,रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केले असून, पुढील ४८ तासांत मुसळधार आणि अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत काळजी घ्यावी, गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्याकडून मच्छिमारांना आवाहन करण्यात आलं आहे.18 ते 22 ऑगस्ट दरम्यान खोल समुद्रात जाऊ नका,हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग हा ताशी 60 किमी पर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे खोल समुद्रात जाऊ नये, काळजी घ्यावी असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, मुंबईच्या मलबार हिल परिसरात पावसामुळे भिंत कोसळली, या घटनेत एका सुरक्षा रक्षाकाचा मृत्यू झाला आहे. सतीश शिर्के असं या 35 वर्षिय सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. शिर्के हे या घटनेत गंभीर जाखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं.