IMD weather forecast : पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा मोठा इशारा

हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे, तब्बल 18 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहान आयएमडीकडून करण्यात आलं आहे.

IMD weather forecast : पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा मोठा इशारा
IMD weather forecast for 12 July
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 11, 2026 | 5:30 PM

1 जुलैपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळालं होतं. 8 जुलैपर्यंत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. पालघर जिल्ह्याला तर पावसाचा मोठा फटका बसला. अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याचं पहायला मिळालं. या पावसामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं. पालघर प्रमाणेच पुणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात देखील या काळात अतिमुसळधार पाऊस झाला. दरम्यान त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असून, तापमानात देखील वाढ झाली आहे. दरम्यान आता पावसाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भारतीय हवामान विभागाकडून दिल्ली, उत्तर प्रदेशसह 18 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. या काळात प्रति तास 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतामधील बहुतांश राज्यात शनिवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पूर्व आणि मध्य भारतात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात पर्वतीय प्रदेशात भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात असं हवामान विभागाने म्हटलं आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

18 राज्यांना पावसाचा इशारा

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू -काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, या काळात 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात 8 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम होता, परंतु आता पावसाने उघडीप दिली आहे, काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान जरी पावसाने या आठवड्यात उघडीप दिली असली तरी पुढील आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

Follow Us