IMD weather forecast : पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा; 17 राज्यांना आयएमडीचा हायअलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी अपडेट

देशभरात पुन्हा एकदा अचानक वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD weather forecast : पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा; 17 राज्यांना आयएमडीचा हायअलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी अपडेट
rain alert
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 21, 2025 | 8:21 PM

देशभरात पुन्हा एकदा अचानक वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये सायक्लोनिक सर्कुलेशन तयार झालं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीसोबतच मुसळधार पावसाची शक्यता आहे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये देखील पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. या काळात या भागांमध्ये प्रतितास 60 किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार असून, या राज्यांमध्ये देखील पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची शक्यता नाही.

पूर्व भारतामध्ये देखील पावसाचा इशारा

पूर्व भारतामध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस पूर्व भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 एप्रिलरोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण भारतातही पाऊस

दक्षिण भारतामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात उष्णतेची लाट

दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. विदर्भात पारा चांगलाच वाढला असून, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 45.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.