IMD Weather Update : देशावर मोठं संकट, 46 बळी घेणारं चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी

बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे, या चक्रीवादळानं श्रीलंकेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं असून, आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD Weather Update : देशावर मोठं संकट, 46 बळी घेणारं चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 4:57 PM

चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. यमन या देशानं या चक्रीवादळाला डिटवाह हे नाव दिलं आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला असून, हे चक्रीवादळ आता हळुहळु भारताकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला असून काही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 23 लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बचाव पथकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता पुढील 12 तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी वेगवान होणार असून, पुढे सरकरणार आहे. या चक्रीवादळाचा भारतासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

24 तासांमध्ये 300 मिलिमीटर पाऊस

या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. गेल्या 24 तासांमध्ये श्रीलंकेमध्ये तब्बल 300 मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. अतिमुसळधार पावसामुळे देशातील अनेक ठिकाणी लँडस्लाइडच्या घटना घडल्या आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा पूर्व आणि मध्य श्रीलंकेला बसला आहे. आतापर्यंत या पावसामुळे तब्बल 46 लोकांचा मृत्यू झाला असून, 23 जण बेपत्ता आहे, बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. दरम्यान त्यानंतर आता हे चक्रीवादळ भारताकडे सरकलं असून, या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर अनेक विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत.

भारतामधील या राज्यांना हाय अलर्ट

दरम्यान चक्रीवादळ डिटवाह हे आता भारताकडे सरकलं असून, या पार्श्वभूमीवर आयएमडी कडून चक्रीवादळापूर्वीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे तीस तारखेपर्यंत या राज्यांमध्ये हवामान अतिशय खराब राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राला किती धोका?

दरम्यान या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांना आहे, मात्र महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहणार असून, सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.