IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे
IMD Weather Update
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 21, 2026 | 5:52 PM

1 जुलै ते 8 जुलै एक आठवडाभर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर तब्बल दहा दिवस पावसाने उघडीप दिली, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली होती. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून राज्यासाठी पावसाचा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तासांसाठी कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भाला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मराठवड्यात काय परिस्थिती?

मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.   मराठवाडामध्ये हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे 40 टक्के पावसाची तूट आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. मराठवाड्यात यंदा जून महिन्यापासूनच पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, अजूनही मराठवाड्यातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

विदर्भात पावसाचा इशारा 

विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुढील ४८ तासांत पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. पुढील तीन दिवस विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.  चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस शभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहनही यावेळी हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

कोकणात पावसाचा यलो अलर्ट 

कोकणासाठी आज हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात कोकण विभागात ढगाळ वातावरण राहणार असून, वाऱ्याचा वेग प्रति तास 40 किलोमीटर इतका राहणार आहे.  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात समुद्राला भरती येणार असून, उंच लाट्या उसळणार आहेत, त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

Follow Us