
लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानलं जातं. जर लोकला पाच मिनिटं वेळ झाला तर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पहायला मिळते, दूरवरून ऑफिसला येणाऱ्या लोकांसाठी मुंबईमध्ये लोकल हाच एकमेव आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय आहे. मात्र आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा एक सलग मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता असून, प्रवाशांचे हाल होऊ शकतात. या 18 तासांच्या सलग एक मेगा ब्लॉकसोबतच इतर छोटे-छोटे आणखी सात ब्लॉक देखील घेतले जाणार आहेत, त्यामुळे या काळात रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध असलेला एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक घेण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी एक ब्लॉक सलग 18 तासांचा घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसची प्रवासी सेवा दिवसरात्र कोलमडन्याची शक्यता आहे. महारेलच्या विनंतीनुसार एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामासाठी एक सलग 18 तासांचा मेगा ब्लॉक तर इतर छोटे-छोटे दोन -दोन तासांचे एकूण सात ब्लॉक घेण्यात येणार आहेत, यासाठी मध्ये रेल्वेच्या विभागीय पातळीवरून मंजुरी देण्यात आली आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी 125 वर्षा जुना असलेला एल्फिन्स्टन पूल पाडण्याचं काम सुरू आहे. पुलाचा पूर्व आणि पश्चिमेकडील भाग जमीनदोस्त करण्यात आला आहे, मात्र रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम जवळपास महिनाभरापासून ठप्प आहे. आता त्यासाठीच मध्य रेल्वेवर सलग 18 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.
प्रवाशांचे हाल
दरम्यान या मेगा ब्लॉक काळात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा परिणाम हा लोकल रेल्वेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील होऊ शकतो. त्यामुळे या काळात प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागणार आहे.