
ऐन निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार सुरु असताना हा हल्ला झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केला आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. या हल्ल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुऱ्यात जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. याआधी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. यानंतर कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इम्तियाज जलील यांनी म्हटले की, ‘राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. लोकशाहीने मला कुठही जाण्याचा आणि पदयात्रा करण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ते करत आहे. आता कुणाला आम्ही इकडे येऊ नये याबाबत आक्षेप असेल, मात्र आमचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचार करत आहोत. आता 16 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्यांचा अर्थ काय आहे आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय आहे.’
एका नाराज कार्यकर्त्यांने म्हटले की, नागरिकांचे प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी वॉर्डमध्ये नगरसेवक असायला हवा. मात्र यांनी 10 किलोमीटर दूर राहणारा नगरसेवक दिला आहे. त्यामुळे नागरिकांचा नेत्यांवर राग आहे. त्यामुळे या वॉर्डमधून त्यांना असाच विरोध असणार आहे. त्यामुळे वॉर्डमधील 500 मुलांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.