रिक्षा चालकांचे अजब मॅनेजमेंट, एका व्हॉट्सअस मॅसेजची कमाल, १७ हजाराची रोकड असलेली बॅग प्रवाशाला परत मिळाली..
रिक्षाचालकांना अनेकदा गुंड म्हणून त्यांची हेटाळणी मध्यमवर्गीय करत असतात. भाडी नाकारणे, किंवा प्रवाशांशी वाद घालणे यामुळे अनेकदा सर्वच रिक्षा चालकांबाबत आपले पूर्वग्रह तयार होतात. मात्र,कल्याण येथील एका रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशाने विसरलेली सॅक त्याला तशीच्या तशी परत केली आहे. या बॅगेत १७ हजाराची रोकड आणि कपडे इतर मौल्यवान वस्तू होत्या.

रिक्षा चालकांवर अनेकदा नाहक संशय व्यक्त केला जातो. मात्र, कल्याणमधील एका रिक्षाचालकाने आपल्या प्रामाणिकपणाची अनोखी ओळख करून दिली आहे.रिक्षात विसरलेली १७ हजार रुपये रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग संबंधित प्रवाशाला परत करीत या सर्वांचेच मन जिंकले आहे.

अकोल्याहून उल्हासनगरमध्ये खरेदीसाठी आलेले सुशील दयावाणी हे आपल्या भावासोबत कल्याण स्थानकात पहाटे उतरले. त्यानंतर त्यांना कल्याण येथे उल्हासनगरसाठी रिक्षा पकडली. त्यावेळी ते त्यांची पाठीवर सॅक ऑटो रिक्षामध्येच विसरुन गेले.

काही वेळानंतर बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँड गाठून रिक्षाचालकांकडे चौकशी सुरू केली.यावेळी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गाठून त्यांनी आपली बॅग विसरल्याची माहिती त्यांना दिली.

रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष जितू पवार यांनी संघटनेच्या ग्रुपवर हा संदेश पाठवला. त्यानंतर संबंधित रिक्षाचालक राजीव सखाराम माने बॅग सुरक्षितपणे संघटनेकडे जमा केली. बॅगेमध्ये १७ हजार रुपये रोख रक्कम, खरेदी केलेले कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. रिक्षाचालक संघटनेचे पदाधिकारी अनिल जगताप यांनच्या हस्तेय ही बॅग मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

बॅग परत मिळाल्यानंतर सुशील दयावाणी अत्यंत भावुक झाले आणि त्यांनी संबंधित रिक्षाचालकाचे आभार मानले. रिक्षा चालकाच्या या प्रामाणिकपणाची आता कल्याण-डोंबिवली परिसरात सर्वत्र चर्चा सुरु आहे.

राजीव सखाराम माने हे आमचे संघटनेचे रिक्षाचालक नाईटला असतात. सकाळी सहा वाजता कल्याणला रेल्वेतून उतरलेला हा प्रवासी उल्हासनगरला त्यांच्या रिक्षातून गेले. प्रवासी उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या रिक्षात ही बॅग मिळाली.त्यामुळे आम्ही उल्हासनगर दोन नंबरमध्ये गेलो आणि कोणी प्रवासी आला होता का ? याची चौकशी केली. त्यानंतर सुशील दयावाणी हे समोर आले. त्यांना त्यांची बॅग जशीच्या तशी परत मिळाली. मागे आम्ही २०२८ साली एका प्रवाशाचे १६ तोळे सोने परत केले होते असेही जगताप म्हणाले.