पालकांनी मोबाईल दिला नाही, ८ वीच्या विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल, हादरले गाव

मोबाईलचे मुलांना इतके व्यसन लागले आहे की मुले आता मैदानी खेळ विसरले आहेत. पालकांच्याकडे मोबाईलसाठी मुले तगादा लावत असल्याने घराघरात मोबाईलवरुन वाद होत आहेत.

पालकांनी मोबाईल दिला नाही, ८ वीच्या विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल, हादरले गाव
| Updated on: Nov 23, 2025 | 9:22 PM

आजकाल मोबाईलच्या पायी घराघरात मुले आणि पालकांत वाद होत आहेत. त्यामुळे मोबाईल ही एक ब्याद बनली आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत एका आठवीच्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आपला जीव दिला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मुलीला मोबाईल हवा होता. परंतू आई-वडीलांना मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते.

ही घटना नागपूर येथील चंकापूर विभागातील हनुमान मंदिराच्या येथे घडली आहे. येथील एका आठवीच्या विद्यार्थीनीने मोबाईल विकत घेऊन दिला नाही म्हणून घरात स्वत:ला कोंडून गळफास लावून स्वत:ला संपवले आहे. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनाम करुन तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

ऑनलाईन गेम्सचे व्यसन

नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार या १३ वर्षांच्या मुलीला मोबाईलवर ऑनलाईन गेम्स खेळण्याची सवय होती. त्यामुळे ती अनेक दिवसांपासून तिच्या आई – वडीलांकडे नवीन मोबाईल फोन विकत घेऊन देण्यासाठी हट्ट करत होती. रविवारी दुपारी जेव्हा आई आणि तिची बहिण बाहेर गेली तेव्हा घरात एकट्या असलेल्या या मुलीने ओढणीने गळफास लावून प्राण दिले. जेव्हा आई घरी आली तेव्हा मुलीची अवस्था पाहून तिने हंबरडा फोडाला. पोलिसांना या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

आधीही अशा घटना घडल्या

महाराष्ट्रात याच महिन्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारची घटना घडली होती. छत्रपती संभाजीनगरातील एका १६ वर्षांच्या तरुण मुलाने त्याच्या आईने मोबाईल दिला नाही म्हणून डोंगरावर उडी मारुन स्वत:ला संपवले होते. या तरुण पोलिस भरतीच्या तयारी करत होता. याआधी गेल्या वर्षी देखील महाराष्ट्रातील एका १५ वर्षांच्या मुलाने वाढदिवसाला मोबाईल फोन गिफ्ट न दिल्याने जीवन संपवले होते.