
सरकारने निवडणूकीच्या कामाला हजर न राहणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची नोटीस पाठवली खरी परंतू ही नोटीस दोन मृत शिक्षकांना मिळाली असल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाने पहिल्यांदा जिल्हा परिषद शिक्षकांना ड्युटी लावली आहे. यात दोन मयत शिक्षकांची ड्युटी लावली असून हा मोठा हलगर्जीपणा आहे. या शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत आम्ही संघटनेच्यावतीने या शिक्षकांचा मृत्यू झाल्याचे कळवले होते. त्यानंतरही मृत पावलेल्या शिक्षकांना हजर न राहिल्याने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे असे जिल्हा परिषद शिक्षक अमोल एरंडे यांनी म्हटले आहे.
निवडणुकीत केंद्राध्यक्ष पदाचे आदेश देताना वयाचा आणि अनुभवाचा विचार करण्यात आला नाही.तीन-चार वर्षांचा अनुभव आहे त्यांना केंद्राध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, जे सीनियर आहेत आहेत त्यांना खालच्या पदावरची जबाबदारी दिली आहे. प्रशासनाने कुठलाही निवडणूक आदेश काढताना पडताळणी करावी असेही त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 हजाराच्या आसपास शासकीय कर्मचारी आहेत. इतर विभागाचे कर्मचारी घेण्याऐवजी शिक्षकांना घेण्यात आले आहे. ज्या शाळा दोन शिक्षकी आहेत त्यांना सुद्धा ड्युटी लावण्यात आली आहे त्यामुळे शाळा बंद राहणार आहे.जिल्हा परिषद शिक्षक सोडून इतरही कर्मचाऱ्यांना सुद्धा यात सहभाग करून घ्यावे अशी मागणी अमोल एरंडे यांनी केली आहे.
मी स्वतः BLO आहे, BLO चे वर्षभर काम असलं तरीसुद्धा पैठण तालुक्यातील 80 टक्के शिक्षकांना पुन्हा महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या सहकाऱ्यांना ड्युटी लावण्यात आली आहे. ज्यांच्या बदल्या इतर तालुक्यात झाल्या आहेत, त्यांच्या ज्या मूळ अवस्थापना पूर्वीच्या शाळा होत्या तिथे त्यांना ऑर्डर आली.एवढी टेक्नॉलॉजी असताना डेटामध्ये एवढी त्रुटी का आहे? जिथे शिक्षक नाही तिथे जर ऑर्डर केली आणि जर तो प्रशिक्षणाला हजर नाही आला तर त्याला कारणे दाखवा नोटीस देणे कितपत योग्य आहे.जे मयत शिक्षक आहेत त्यांना सुद्धा ड्युटी लावण्यात आली आहे त्यांच्यासाठी आलेल्या आर्डर स्वर्गात कोण पोहोचवणार आहे.एक शिक्षक म्हणून व्यक्ती म्हणून आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत, घरी पोहोचतो न पोहोचतो दहा लिंक येतात भरायला असे अमोल एरंडे यांनी म्हटले आहे.
8000 कर्मचारी मनपा निवडणुकीसाठी हा संपूर्ण डाटा जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला होता. यातील अनेक जण निवडणूक कामकाजाला हजर न राहिल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. 8 हजार पैकी 2 शिक्षक कामकाजासाठी गैरहजर होते,त्यापैकी अधिकृत कारण दिलेले सोडून जवळपास 1200 शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये मृत शिक्षकांचाही समावेश होता,कारण संस्थेने त्यांच्या मृत्यूबाबत आम्हाला कुठलीही कल्पना दिलेली नव्हती असे निवडणूक अधिकारी विकास नवाळे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.