बीड हादरलं, तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने हल्ला, मोठी खळबळ
बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाने थेट तलाठ्यावर हल्ला केला आहे.

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाने थेट तलाठ्यावर हल्ला केला आहे. गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तलाठी जखमी झाला असून, त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर चिंचोली येथे कार्यरत असलेले तलाठी विलास तपसे यांच्यावर कार्यालयात घुसून वाळूमाफियाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तपसे यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
आहेर चिंचोली परिसरात सिंदफना नदीचे पात्र असून या नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफीयाचे काही साहित्य विलास तपसे यांनी जप्त केले होते. याचा राग आल्याने या वाळूमाफियाने विलास तपसे यांच्या कार्यालयात दाखल होत माझे जप्त केलेले साहित्य परत द्या अशी मागणी केली. यावर तपसे यांनी साहित्य परत करता येणार नाही, असे सांगताच वाळूमाफियाने हातातील रॉडने त्यांना मारहाण केली. जखमी अवस्थेतील तपसे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर दुसरीकडे महसूल कर्मचारी संघटनेने आरोपी विरोधात कठोर कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय.
दरम्यान यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू माफियाने थेट तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्यावर हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा महसूल कर्मचारी संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. आरोपी विरोधात लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच महसूल कर्मचारी संघटनेकडून आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत, बुधवारी पुण्यात गोळीबार झाला, तर गुरुवारी नाशिक जिल्ह्यात देखील गोळीबाराची घटना घडली आहे. त्यातच आता तलाठ्यावर देखील हल्ल्याची घटना घडली आहे.
